Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल बारामतीत शरद पवारांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज कुठलीही पूर्वसूचना न देता भुजबळ हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. बराच वेळ वेटिंग केल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. भुजबळांनी या भेटीमागील कारण सांगितलं. त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली.
भुजबळ हा बेईमान माणूस…
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना भुजबळ-पवार भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली तर काय झालं? मुळात भुजबळ हा बेईमान माणूसआहे. ज्याचं खातो, त्याचे वाईट करतो. छगन भुजबळ ही व्यक्ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना फोडली, नंतर शरद पवारांची साथ धरली, त्यांना देखील त्रास दिला. आता अजित पवारांचे वाटोळं केल्याशिवाय राहणार नाहीत, असं जरांगे म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की, मुळात भुजबळांना महाराष्ट्रातील स्फोटक परिस्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याची भाषा ही भुजबळांनीच केलेली आहे. त्यांनीच अंबडच्या मेळाव्यात प्रथम कोयत्याची भाषा वापरली, हातपाय तोडण्याची भाषा वापरली. त्यांनीच राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे, असंही जरांगे म्हणाले.
एक दोन चार ओबीसी नेत्यांना हाताशी धरून मराठा समाजाविरोधात वादग्रस्त विधान करायला लावायचा, हा त्यांचा धंदा बनला आहे. मुळात भुजबळ हा नेताच बेईमान आहे. ओबीसी-मराठा वाद यांनीच उभा केला अन् लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी डाव रचायचा हा त्याचा उद्योग आहे. गोरगरीब मराठे अन् गोरगरीब ओबीसी संपवणे हा त्याचा उद्देश आहे, अशी टीका जरांगेंनी केली.