Maharashtra Assembly: विधानसभेतील म्हातारे अर्क; 14 आमदार ‘सत्तरीपार’…
Maharashtra Legislative Assembly : 14 आमदार सत्तरीपार आहेत. भाजपचे सहा आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत.
Maharashtra Legislative Assembly : चौदाव्या विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Legislative Assembly) वर्षपूर्ती नुकतीच झालीय. जसे विधानसभेमध्ये तरुण तुर्क अठरा आमदार आहेत. तसेच 14 आमदार म्हातारे अर्क म्हणजे सत्तरीपार आहेत. यात सर्वाधिक भाजपचे सहा आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत. काँग्रेस, उबाठा आणि जनसुराज्य पक्षाचा या पक्षाचा प्रत्येकी एक आमदार सत्तरीपार आहे. या यादीत सत्तरीपार केलेले आमदार, मंत्र्यांसाठी वय हे नंबर गेम आहे. कारण ते तरुण आमदाराला लाजवतील, असा त्यांचा कारभार अॅक्टिव्ह आहे. त्यांच्याकडं जनसंपर्क आणि कामाचा धडाका आहे. तर कोण कोण आहेत महाराष्ट्रातील सत्तरीपार आमदार? सविस्तर पाहुयात…(maharashtra-legislative-assembly-oldest-mla-dilip-sopal-nitin-raut-hasan-mushrif)
सर्वाधिक अनुभवी आमदार अन् मंत्री छगन भुजबळ...
महाराष्ट्रातील सध्याच्या मंत्रिमंडळात अन् विधानसभेत सर्वाधिक अनुभवी आमदार आहेत. त्यात पहिलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) . भुजबळ हे 77 वर्षांचे असून ते नाशिकमधील येवला मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. ते अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री आहेत. भुजबळांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. पुढं शरद पवारांबरोबर ते राष्ट्रवादीत आले आणि आता ते अजित पवारांबरोबर आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री देखील राहिलेले आहेत.
सातव्यांदा विधानसभेत गेलेले दिलीप सोपल…
ज्येष्ठ सदस्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिवसेना ठाकरे गटाचे 75 वर्षीय आमदार दिलीप सोपल. ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. दिलीप सोपल हे नऊ वेळा विधानसभेची निवडणूक लढले आहेत, ते सातव्यांदा विधानसभेत गेले आहेत. त्यात सहावेळा त्यांचं पक्षचिन्ह हे वेगवेगळं राहिलेलं आहे.
74 वर्षीय आमदार गणेश नाईक…
ज्येष्ठ आमदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, सध्याचे वनमंत्री गणेश नाईक. ते 74 वर्षांचे आहेत, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. उत्पादन शुल्क राज्यमंत्री, अपारंपरिक उर्जा मंत्री, पर्यावरण आणि वनमंत्री अशी मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहेत. ते ऐरोली मतदारसंघातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
तीनवेळा आमदार झालेले रवीशेठ पाटील
या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत भाजपचे पेणचे आमदार रविशेठ पाटील. 73 वर्षीय रविशेठ पाटील हे तिसऱ्यांदा पेणचं प्रतिनिधीत्व करतायत. राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलंय. 2004 ला ते काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 दोन्ही वेळेस ते पराभूत झाले. त्यानंतर 2019 ला ते भाजपमध्ये गेले आणि आमदार झाले.
वादग्रस्त राजकीय कारकिर्द ठरलेले 72 वर्षीय किसन कथोरे
72 वर्षीय भाजपचे किसन कथोरे हे मुरबाड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. ते विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले आहेत. आमदार किसन कथोरे यांची राजकीय कारकिर्द वादळी आणि तितकीच वादग्रस्त ठरलीय. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. एका हत्येचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. तेव्हा ते राष्ट्रवादीत होते. 2004 ला पहिल्यांदा ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आणि 2014 ला ते भाजपवासी झाले.
72 वर्षीय प्रकाश भारसाकळे
भाजपचे अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे 72 वर्षांचे आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. ते खासदार नारायण राणे यांच्या जवळचे आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर लागलेली पोटनिवडणूक दर्यापूर मतदारसंघातून जिंकले. पुढं अकोटमध्ये अपक्ष निवडणूक लढले आणि ते पराभूत झाले. त्यानंतर 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत ते अकोला मतदारसंघातून विजयी झाले.
पाचव्या टर्मचे आमदार नितीन राऊत…
या यादीत काँग्रेस नेते नितीन राऊत हेही आहेत. 72 वर्षीय राऊत हे नागपूर उत्तरचं प्रतिनिधीत्व करतात. 1999 पासून ते नागपूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेत जातात. त्यांची ही पाचवी टर्म आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यापैकी ते एक आहेत. त्यांनी रोजगार हमी योजना, जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय, गृह, उत्पादन शुल्क अशी मंत्रिपदही भूषवली आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देणारे सुधीर गाडगीळ…
71 वर्षीय सुधीर गाडगीळ हे सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत. 2014 पासून ते सांगलीचं प्रतिनिधित्व करतात. ज्या सांगलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, तिथून ते भापच्या तिकिटावर आमदार होत आहेत.
पाचव्या टर्मचे आमदार चैनसुख संचेती
71 वर्षीय भाजपचे चैनसुख संचेती हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. ते सलग पाचवेळा इथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे कुटूंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. त्यांचे काका किसनलाल संचेती यांनीही मलकापूरचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे.
सहा मंत्रिपदं भूषविणारे धर्मरावबाबा आत्राम…
71 वर्षीय धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचं राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व करतायत. ग्रामपंचायत सदस्य ते कॅबिनेटमंत्री, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अजितदादा महायुतीबरोबर गेल्यानंतर ते कॅबिनेटमंत्री झाले होते. अहेरी मतदारसंघातून ते पाचवेळा विजयी झालेत. परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासीविकास, खणीकतर्म, वनमंत्री, अन्न व औषध प्रशासनाचं मंत्रिपदही त्यांनी भूषविलं आहे. विशेष म्हणजे अत्राम यांना प्रत्येक वेळी घरातील व्यक्तीशी लढत द्यावी लागलीय. भाऊ, पुतण्यानंतर 2024 ला त्यांना मुलगी भाग्यश्री आत्रामविरुद्ध लढावं लागलं.
सत्तरी गाठलेले चार विधानसभा सदस्य…
या यादीमध्ये अशोकराव माने, हसन मुश्रीफ, काशिनाथ दाते आणि प्रकाश सोळंके या चार विधानसभा सदस्यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघाचं जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने प्रतिनिधित्व करतात. तर इतर तिघं राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हसन मुश्रीफ हे कागल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून, ते सलग सहाव्यांदा इथून निवडून आलेले आहेत, सध्या ते वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. 1999 पासून त्यांनी वेगवेगळ्या खात्याचं मंत्रिपद भूषवलेलं आहे. पुढचे विधानसभा सदस्य आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे काशिनाथ दाते, हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर राष्ट्रवादीनं थेट आमदारकीसाठी त्यांना मैदानात उतरवलं. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा त्यांनी बाराशे मतांनी पराभव केला. तर प्रकाश सोळंके हे माजलगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, ते चौथ्यांदा इथून निवडून आले आहेत. त्यांना राजकीय वारसा होता. माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके हे त्यांचे वडिले होते. प्रकाश सोळंके एकदा मंत्रीही झालेत. या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं त्यांनी अनेकदा अजितदादांवर नाराजी व्यक्ती केलीय. वय झालं म्हणून यंदाची निवडणूक ते लढवणार नव्हते. मात्र शेवटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि पुन्हा आमदार झाले. हे आमदार सत्तरीपार असले तरी त्यांचा कामाचा धडाका मात्र तरुण आमदारांसारखाच आहे.
