Manoj Jarange Hunger Strike Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाण्याच्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. उद्या हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना होण्याची तयारी केलेल्या जरांगे यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. (Jarange) आपण मुंबईला एकटेच जाणार असल्याचं जाहीर करत, समर्थकांनी आपल्यासोबत मुंबईला येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईत धडक देण्याच्या जरांगेंच्या आधीच्या निर्णयाला आता नवं वळण मिळालं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आपल्यालाही डाव टाकावा लागणार असल्याचं ते म्हणाले. आता आपण एकटेच मुंबईत येणार असल्याने सरकार आपल्याला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देणार का, असा थेट सवालही जरांगे यांनी फडणवीस सरकारला केला आहे.
Video : संयमाने घ्या म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक
उद्या अंतरवलीतून निघायचं आहे. पण उद्या मुंबईला जाताना मी एकटा एक गाडी घेऊन जाईल. जास्तीत जास्त दोन गाड्या माझ्यासोबत असतील. एक गाडी बंद पडली तर दुसऱ्या गाडीत बसता येईल. त्याशिवाय सोबत दोन रुग्णवाहिका असतील. एक बिघडली तर दुसरीत बसायला होईल. जास्तीत जास्त चार गाड्या माझ्यासोबत असतील. माझ्यासोबत पाच किंवा दहा माणसांपेक्षा अधिक लोक नसतील. इतरांनी मुंबईला यायचं नाही. फक्त मी एकटाच जाणार आहे. तुम्ही मुंबईला कधी यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन, असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.
सणावाराच्या आड येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला आहे, आता त्यांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आहे. त्यांची माणसं रॅलीत घुसवून मारामाऱ्या करण्याचा डाव आहे. म्हणजे दंगलीचा डाग मराठ्यांवर येईल. त्यामुळंच आपल्यालाही नवा डाव टाकावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून मी एकटा मुंबईला जाईन. तुम्ही यायचं नाही. त्यांनी सणांच्या आडून आपल्याला परवानगी नाकारली ना? मग मला एकट्याला परवानगी देतात की नाही ते पाहायचं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसंच, पुढील दिशा मी तुम्हाला कळवेल असंही ते म्हणाले.
