Download App

अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाचा जीआर; शिंदेंच्या 3 शिलेदारांची विनंती निष्फळ, जरांगे उपोषणावर ठाम

Maratha Reservation : जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी आणि उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची  शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार अर्जून खोतकर यांच्या मनधरणीनंतरही मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने मागितेली एक महिन्याची वेळ देण्यासही नकार देत जरांगे पाटील यांनी चार दिवसांत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. (Manoj Jarange Patil is adamant on his hunger strike despite the insistence of ministers)

सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात :

मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे या मंत्र्यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी आणि उपोषण मागे घेण्यासाठी जालन्यात आले होते. यावेळी आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार अर्जून खोतकरही उपस्थित होते. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधिचा अहवाल येण्यासाठी आणि निर्णय होण्यासाठी अद्याप एक महिन्याचा कालावधी हवा आहे. तोपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे, जास्त आंदोलन ताणू नये, तब्येतीची काळजी घ्यावी, असे महाजन म्हणाले.

संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांनीही मुंबईत चला मुख्यमंत्र्यांची भेट घ्या, त्यांच्यासमोर बसा आपण तोडगा काढू अशी विनंती केली. मात्र या सर्वांच्या मध्यस्थीनंतरही जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यास आणि आंदोलन थांबविण्यान नकार दिला. मी यापूर्वी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र त्यांच्याकडून आरक्षणाचा निर्णय झाला नाही. आता आणखी एक महिन्याचा वेळ कशाला हवा? असा सवाल करत मी उपोषण मागे घेणार नाही असे सांगितले. तातडीने आरक्षणाचा अध्यादेश काढा. आता माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाचा जीआर निघेल, अशी भूमिका पाटील यांनी घेतली.

जवळपास अर्धा तास चाललेल्या चर्चांनंतर जरांगे पाटील यांनी चार दिवसांचा वेळ सरकारला दिला. निर्णय घ्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. आपण आधीपासूनच ओबीसीमध्ये आहोत. केवळ प्रमाणपत्र द्यायची आहेत, हा निर्णय घ्या, 13 ते 14 लाख मराठा समाज तुमची मिरवणूक काढेल, असे म्हणत जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाला माघारी पाठविले. मात्र पाणी पिण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी तयार असल्याचे सांगत काहीस सौम्य उपोषण करण्याची तयारी त्यांनी दाखविली. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते.

Tags

follow us