Download App

मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा : भरती प्रक्रिया सुरु झालेल्या परिक्षांमध्ये लाभ मिळणार का?

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारने 27 जानेवारी रोजी मराठा-कुणबी समाजासाठी काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्याची शक्यता आहे.

मात्र या दरम्यान, मराठा आरक्षणाबाबात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यात सर्वात महत्वाचा म्हणजे, कायदा होण्यापूर्वी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे का? कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर सरकारकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील सर्वात महत्वाची मागणी भरती प्रक्रियेसंदर्भातील होती. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवावी किंवा मराठा समाजासाठीच्या आरक्षणातून मिळणाऱ्या जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया करावी अशी मागणी केली होती.

‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी अन् ‘ओबीसी’तूनच आरक्षण; मनोज जरांगे पाटील ठाम

पण आता विधेयकातील तरतुदीनुसार, कायदा होण्यापूर्वी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षणचा लाभ मिळणार नाही. याशिवाय सरकारने कोणत्याही जागा राखीव ठेवल्या नसल्याचेही समोर आले आहे. (Maratha community will not get the benefit of reservation in the recruitment process which started before the law was enacted)

विधेयकातील भरती आरक्षणाच्या लाभाची तरतूद जशीच्या तशी :

(१) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी ज्या प्रकरणी, आधीच निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असेल, त्या प्रकरणांना, या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणार नाहीत, आणि अशा प्रकरणांच्या बाबतीत, अशा प्रारंभापूर्वी कायद्याच्या ज्या तरतुदी लागू होत्या आणि जे शासकीय आदेश लागू होते, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल,

स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनार्थ, जेव्हा संबंधित सेवा नियमांन्वये –

(एक) केवळ लेखी चाचणीच्या किंवा मुलाखतीच्या आधारे, भरती करावयाची असेल आणि अशी लेखी चाचणी किंवा, यथास्थिति, मुलाखत सुरू झाली असेल; किंवा

(दोन) लेखी चाचणी व मुलाखत या दोन्हीच्या आधारे भरती करावयाची असेल आणि अशी लेखी चाचणी सुरू झाली असेल, त्याबाबतीत, निवड प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानण्यात येईल.

Chhagan Bhujbal : ..तर मग वेगळ्या कायद्याची गरजच काय? भुजबळांचा सरकारला खोचक सवाल

(२) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी, ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा ज्या प्रकरणी, आधीच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असेल अशा संस्थांमधील किंवा प्रकरणांमधील प्रवेशांना, या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणार नाहीत, आणि अशा प्रकरणांच्या बाबतीत, अशा प्रारंभापूर्वी, कायद्याच्या ज्या तरतुदी लागू होत्या आणि जे शासकीय आदेश लागू होते, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

स्पष्टीकरण. – या कलमाच्या प्रयोजनार्थ, जेव्हा,- (एक) कोणत्याही प्रवेश चाचणीच्या आधारे प्रवेश द्यावयाचा असेल, आणि अशी प्रवेश चाचणीची प्रक्रिया सुरू झाली असेल; किंवा

(दोन) प्रवेश चाचणीच्या आधारे असेल त्याव्यतिरिक्त प्रवेश द्यावयाचा असेल त्याबाबतीत, अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक समाप्त झाला असेल, त्याबाबतीत, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानण्यात येईल.

follow us