माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार

घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढून घरात लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली.

News Photo   2026 09 05T203058.173

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार

पाटोदा तालुक्यातील नाळवंडी परिसरात 9 वर्षीय चिमुकलीवर (Beed) अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात बबन काळे (62, रा. नाळवंडी) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 155/2026 दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारास नाळवंडी शिवारातील बाजरीच्या शेतात ही घटना घडली. पीडित मुलीची आरोपीसोबत आधीपासून ओळख होती. चॉकलेट घेण्यासाठी 20 रुपये देण्याचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला शेताकडे नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिच्या चुलतीने घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तोफखान्यांत बीडचे दोघे

घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढून घरात लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नवले यांच्या आदेशाने पोउपनि के. के. चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कुटुंबीयांची व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी फोनवरून कुटुंबीयांचा संवाद करून दिला. सुळे आणि पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल आहे.

मेहबूब शेख यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सरकारने केवळ निषेध नोंदवून थांबता कामा नये, अशी भूमिका मांडली. या प्रकरणाचा तपास जलद आणि निष्पक्षपणे पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, पीडित कुटुंबाला कायदेशीर मदत व आवश्यक सुरक्षा द्यावी तसंच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आरोपी बबन काळे याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल असून पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते, असं सांगण्यात आलं. गावातील महिलांची छेडछाड केल्याच्या तक्रारीही यापूर्वी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळं या प्रकरणात आरोपी दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version