दसऱ्यात झेंडूची फुलं विकली 50 रुपयांना; गेवराईतील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं

Dussehra : दसऱ्यात झेंडूला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याल्या यंदा निराशा आली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 20T143620.443

दसऱ्याच्या सणासाठी घरांवर झेंडूची (Dussehra) तोरणे सजली, देवांच्या चरणी फुलं वाहिली गेली; पण हीच फुलं पिकवणाऱ्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. नवरात्र आणि दसऱ्यात झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची यंदा निराशा झाली आहे. पावसाअभावी उत्पादन घटलं असून बाजारात एका गाठडीला अवघे ५० रुपये मिळत आहेत. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च, घेतलेली मेहनत आणि सणासुदीच्या हंगामात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा यावर पाणी फिरल्याचं चित्र आहे.

नवरात्र आणि दसरा हा झेंडू उत्पादकांसाठी कमाईचा महत्त्वाचा काळ असतो. याच हंगामात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करून फुलांची लागवड करतात. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने झाडांची वाढ खुंटली. उपलब्ध पाण्यावर पीक टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली, तरीही अपेक्षित उत्पादन मिळालं नाही. त्यातच बाजारात दर कमी असल्याने उत्पादन घटण्याबरोबरच उत्पन्नालाही मोठा फटका बसला आहे.

गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील शेतकरी प्रमोद माळतकर यांनी झेंडूची जवळपास ४ हजार रोपे लावली होती. या लागवडीतून सुमारे दीड टन फुलांचं उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना केवळ अडीच क्विंटल फुलं मिळाली. उत्पादनात मोठी घट झाल्याने त्यांचं आर्थिक गणित आधीच बिघडलं होतं. त्यात बाजारात एका गाठडीला फक्त ५० रुपये भाव मिळत असल्याने लागवडीवर केलेला खर्च कसा भरून काढायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे आता टेंडर योद्धा; अजय बारस्कर भडकले

“चार पैसे मिळतील, या अपेक्षेने झेंडूची लागवड केली. चार हजार रोपांची काळजी घेतली आणि त्यासाठी खर्चही केला. दीड टन फुलं मिळतील, असं वाटलं होतं; पण अडीच क्विंटलच उत्पादन झालं. त्यात गाठडीला अवघे ५० रुपये मिळत आहेत. एवढे कष्ट करूनही हातात काही उरत नसेल, तर शेती करायची कशी,” अशी व्यथा प्रमोद माळतकर यांनी मांडली. सणासुदीच्या हंगामात चांगला भाव मिळेल, या आशेने पीक घेतलं; मात्र उत्पादन आणि दर दोन्ही बाजूंनी फटका बसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

पावसाअभावी उत्पादन घटण्याबरोबरच प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांचाही नैसर्गिक झेंडूच्या मागणीवर परिणाम होत असल्याचं शेतकरी कल्याण येवले यांनी सांगितलं. घरांची सजावट आणि तोरणांसाठी कृत्रिम फुलांचा वापर वाढत असल्याने नैसर्गिक फुलांना अपेक्षित मागणी मिळत नाही. त्यामुळे बाजारात झेंडूचा दर वाढण्याऐवजी कमीच राहत आहे. एका बाजूला कमी उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला घटलेली मागणी, अशा दुहेरी संकटात झेंडू उत्पादक सापडले आहेत.

दसऱ्याच्या सणात ग्राहक झेंडूची फुलं खरेदी करत असले, तरी त्यामागे शेतकऱ्यांचा मोठा खर्च आणि मेहनत असते. यंदा पावसाने साथ न दिल्याने पीक कमी आलं आणि बाजारभावही अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही. परिणामी, सणासुदीच्या हंगामातून आर्थिक फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांचं नुकसान वाढलं आहे. झेंडू उत्पादकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

follow us