बीडमधील महावितरणचा बेजबाबदारपणा जीवावर बेतला, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्व उघड्या डीपी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.

Beed

बीडमधील महावितरणचा बेजबाबदारपणा जीवावर बेतला, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

बीडमधील महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचा चेहरा समोर आला आहे. (Beed) शहरातील गोरे वस्ती भागात असलेल्या एका उघड्या विद्युत जनहित्राला चिटकल्याने 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेख आवेज शेख परवेज असं या मृत मुलाचं नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमधून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गोरे वस्ती परिसरात नेहमीप्रमाणे जनजीवन सुरू असताना शेख आवेज हा परिसरातून जात होता. याच भागात महावितरणची एक उघडी डीपी आहे, ज्याची दारे उघडी होती आणि तारा बाहेर लोंबकळत होत्या. या उघड्या डीपीला आवेजचा अचानक स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्का लागून तो तिथेच कोसळला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित विभागाला माहिती दिली.

बीडमध्ये बालविवाहाचा भांडाफोड, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी रचला सापळा

आवेजला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर गोरे वस्तीसह संपूर्ण शहरातील नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या डीपीची दुरवस्था आणि त्यातून होणारा धोका याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बीड शहरात अशा अनेक ठिकाणी उघड्या डीपी मृत्यूचा सापळा बनून उभ्या आहेत.

महावितरणचे अधिकारी शहरातील विजेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी केवळ कंत्राटदार (गुत्तेदार) पोसण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. कधी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागतात, तर कधी अशा प्रकारे निष्पापांचा बळी जातो, तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. दरम्यान, आवेजच्या मृत्यूला पूर्णपणे महावितरणचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्व उघड्या डीपी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.

Exit mobile version