बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार पोलीस ठाणे (Beed) हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट आहे.
दरम्यान, या नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित मुलीला तब्बल चार दिवस उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिलं नाही, असा संतापजनक प्रकार प्राथमिक तपासात उघड झाला आहे.
गड आला पण सिंह गेला! गोदाकाठचा वाघ बीडमध्ये, घराणेशाही संपली का? वाचा A टू Z कहाणी
11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर मुलीला असह्य वेदना होत असतानाही ग्रामस्थांनी ‘गावाची बदनामी नको’ या कारणास्तव पीडित कुटुंबाला उपचारासाठी बीड येथे जाण्यास मज्जाव केला. चार दिवस त्रास सहन केल्यानंतर अखेर मुलीच्या नात्यातील काही व्यक्तींना ही घटना समजली. त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर कासार पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला.
सध्या पीडित चिमुरडीवर बीड येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या छळाची आपबीती सांगत असताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. या संपूर्ण प्रकरणातील ग्रामस्थांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील लोकांनी बदनामीच्या भीतीने पीडित कुटुंबालाच धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
