बीडमध्ये मोठी कारवाई! डॉक्टरांना एमडी ॲडमिशनचं आमिष, कोट्यवधींचा गंडा

या प्रकाराच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे यामध्ये समोर आले.

News Photo   2026 01 14T144841.185

बीडमध्ये मोठी कारवाई! डॉक्टरांना एमडी ॲडमिशनचं आमिष, कोट्यवधींचा गंडा

उच्च शिक्षणासाठी एमडी (MD) ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा.नागपूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याने केवळ बीडच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्ये तब्बल 3 कोटी 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

धारूर तालुक्यातील सोनी मोहा येथील रहिवासी डॉ.अविनाश तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एमडी मेडिसिनसाठी प्रवेश घ्यायचा होता. याच दरम्यान त्यांची फेसबुकवरील एस.के. एज्युकेशन या अकाऊंटद्वारे आरोपी सौरभ कुलकर्णीशी ओळख झाली. आरोपीने वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून 65 लाख रुपयांत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

बीडच्या परळीत मोठी राजकीय घडामोड; एमआयएम शिंदेसेनेची युती झाली अन् तुटली

आरोपीने डॉ. तोंडे यांच्याकडून सप्टेंबर 2024 मध्ये प्रवेशासाठी आगाऊ 8 लाख रुपये (रोख आणि फोन-पे द्वारे) घेतले. मात्र, कोणत्याही यादीत नाव न आल्याने फसवणूक झाल्याचे डॉ. तोंडे यांच्या लक्षात आले. जेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपीने “तुला काय करायचे ते कर, मी पैसे देणार नाही” अशी धमकी दिली. अखेर 9 डिसेंबर 2025 रोजी धारूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बीडचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबईसह पंजाब आणि गुजरातमध्ये एकूण 15गुन्हे दाखल आहेत. आरोपी सातत्याने आपली ठिकाणे बदलत होता. मात्र, बीड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सातारा जिल्ह्यातील कराड येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी सौरभ कुलकर्णीने विविध शहरांत फसवणुकीचा आकडा 3.86 कोटींच्या घरात नेला आहे. महाराष्ट्रात नाशिक (सरकारवाडा), सोलापूर, जालना (चंदनजिरा, घनसांगवी), नागपूर (धनतोली, जरी फटका, हुडकेश्वर), पुणे (खडकी), मुंबई (दहिसर), सांगली (तासगाव) तर पंजाब (अमृतसर), गुजरात (बनासकांठा) येथे आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे शिक्षण प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती त्वरित पोलिसांना द्या, असे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी केले आहे.

Exit mobile version