अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असताना जागा राखीव, बीडमध्ये नेत्यांचे डाव प्रतिडाव

बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या (एससी) महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे.

News Photo   2025 11 17T171214.844

News Photo 2025 11 17T171214.844

गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. (Beed) मराठा आरक्षण आंदोलनाच्या धगीमुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बीड जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीने संपूर्ण समीकरणे बदलून गेली आहेत. नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक आणि त्यांचे ‘आका’ गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र आरक्षण पडल्याने आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावाचून मुख्य राजकीय पक्षांना आणि नेत्यांना पर्याय उरला नाही.

बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या (एससी) महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई ओबीसींसाठी, धारूर सर्वसाधारण तर गेवराई आणि परळीत खुल्या गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर

बीडच्या नगर परिषदेवर सत्ता गाजविण्यासाठी जिल्ह्यातील नेते इच्छुक असतात. बीडमध्ये अतिशय प्रबळ आणि मातब्बर असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये गेलेले योगेश क्षीरसागर यांच्यात खऱ्या अर्थाने मोठी चुरस असणार आहे. त्याचबरोबर गेवराईच्या पंडितांनी अजित पवार पक्षाची सुत्रे हाती घेतल्याने त्यांचा आणि योगेश क्षीरसागर यांचाही संघर्ष अधिक पेटला आहे. येथे दोन्ही गटांना अनुसूचित प्रवर्गाच्या महिलेला संधी द्यावी लागणार आहे.

माजलगावात काय होणार?

मराठा आरक्षण आंदोलनात ओबीसी समुदायाच्या निशाण्यावर असलेले अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके टार्गेटवर आहेत. विशेष म्हणजे माजलगाव हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालं आहे. त्यामुळे सोळंके यांना ओबीसी समुदायाशी जुळवून घ्यावं लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांचा सक्रीय सहभाग आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ केलेली वक्तव्ये पाहता ओबीसी समुदाय सोळंके यांना कसा प्रतिसाद देतो, हे पाहणे औत्सुक्याचं असेल.

अंबाजोगाईमध्ये काय होईल?

भाजपच्या आमदार नमिता मुंडदा, त्यांचे पती अक्षय मुंदडा यांचे तालुक्यावर वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी दंड थोपटून तयार आहेत. दोन्ही पक्षात अत्यंत निकराची लढाई होण्याची शक्यता आहे. महायुतीत कुस्ती होण्याची शक्यता आहे.

गेवराईतील राजकीय समीकरण काय?

गेवराईत विजयसिंह पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार यांच्या गटात नगराध्यक्षपदाचा सामना होईल. गेवराईत लक्ष्मण पवार गटाचा नगराध्यक्ष होता. परंतु, विधानसभेला विजयसिंह पंडित निवडून आल्याने पूर्ण ताकदीनिशी पवार गटाला नमविण्याचा प्रयत्न ते करतील. तसंच, येथील बदामराव पंडित यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेही आपला माणूस रिंगणात उतरवतील असं दिसतय.

धारूरचे गणित काय?

माजलगाव विधानसभा मतदारसंघात धारूर नगर परिषद येते. येथे ठराविक नेत्याचा प्रभाव आहे, अशी सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे समोरील उमेदवार कोण आणि किती प्रबळ आहे, यावरच सारी गणिते अवलंबून असतील.

परळीत काय होणार?

राज्यातील सत्ता समीकरणे बदल्यानंतर परळीतही समीकरणांमध्ये बदल झाला. मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याचं चित्र आहे. परंतु, दोघांना मानणारा कार्यकर्ता वर्ग वेगळा असल्याने आता नगर परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार की अजून तिसरे समीकरण आकाराला येणार? हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना विधानसभेला फाईट देणारे राजाभाऊ देशमुखही आपला गट ताकती उतरवण्याच्या तयारीत आहेत.

Exit mobile version