Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. (Sambhajinagar) जिल्हा बालविकास अधिकारी यांचं तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
बालविकास अधिकारी निलंबीत
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होतं. त्यावेळी या मुलींचा छळ झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ज्या काही अनियमितता बाहेर आल्या आहेत त्या भयानक आहेत. तसंच, त्यांनी यावेळी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचं सांगितलं.
संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या होत्या?, धक्कादायक कारण आलं समोर
या घटनेत पोलिसांनी 80 मुलींची चर्चा केली, आधी त्या बोलत नव्हत्या. मात्र, आता त्या त्यांच्यासोबत काय घडलं हे सांगत आहेत. अनेक गंभीर गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत. बालगृह अधीक्षक आणि सगळ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची मान्यता पूर्ण रद्द करण्यात आली आहे. 3 वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक याबाबत चौकशी करत आहेत. उद्या याबाबत अहवाल देणार आहेत. जे कुणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून पळालेल्या मुलींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. बालगृहातील मुलींचं कुठल्याही कारणाने पोट दुखलं तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.