सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणींत वाढ; हक्कभंग प्रकरणात विधिमंडळाने प्रस्ताव केला मंजूर

Violation Of Rights Motion Pgainst Sushma Andhare and Kunal Kamra : हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि कुणाल कामरा (Kunal Kamra) अडचणीत आले आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली (Violation Of Rights Motion) आहे. यापूर्वीच्या अधिवेशनात या प्रकरणाची तीव्र चर्चा झाली होती आणि आता त्यावर अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कुणाल कामराने आपल्या ‘नया भारत’ या स्टँडअप शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक कविता आणि गाण्याद्वारे टीका केली होती. यामध्ये त्यांच्या दाढी, चष्मा आणि शिवसेनेतील बंड यावर विनोदी शैलीत भाष्य करण्यात आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. काही कार्यकर्त्यांनी कामराचा शो जिथे झाला त्या स्टुडिओवर हल्ला केला, तसेच काही पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले.
सैफ अली खानच्या अडचणी वाढल्या! कोर्टाचा मोठा दणका, 25 वर्षांपूर्वीचा ‘तो’ महत्वाचा निर्णय रद्द
सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप
याच व्हिडिओचा पाठपुरावा करत सुषमा अंधारेंनी देखील तो व्हिडिओ शेअर केला आणि स्वतः त्याच गाण्याचा व्हिडिओ तयार केला. त्यामुळे त्यांच्यावरही सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप झाला आणि हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी या दोघांविरोधात विधानमंडळाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता. दरेकर यांनी यावेळी विधानसभेत बोलताना सांगितले, की कामराने जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला आहे. सुषमा अंधारेंनी त्याला समर्थन देत अत्यंत खालच्या स्तरावरची भाषा वापरली आहे. हे वर्तन विधानमंडळाच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे आहे, त्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
BCCI बांग्लादेशला देणार दणका! टीम इंडियाचा नियोजित दौरा टळण्याची चिन्हे; काय घडलं?
या मागणीनंतर सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशीसाठी सुपूर्त केल्याचे जाहीर केले. आता कामरा आणि अंधारे यांना यासंदर्भात नोटीस बजावली जाणार असून, त्यांना आपले म्हणणे स्पष्ट करावे लागणार आहे. या कारवाईमुळे दोघांचीही अडचण वाढली असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.