Marathwada Water Issue : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पाण्यावरूनही (Marathwada Water Issue) ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलन सुरू असल्याने जायकवाडीत पाणी सोडू नका असे लेखी पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहे. ठाकरे गटानंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी खरमरीत ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तुर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे.
हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या…— Ashok Chavan (@AshokChavan1958) November 24, 2023
हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे. पाण्याची प्रतिक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांतून जायकवाडीत 8.6 टीएमसी पाणी सोडण्याच्या 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी मागणी पुन्हा करत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
तर आम्ही अधिवेशन बंद पाडू – आमदार पाटील
या पत्रावरून आता जोरदार वाद सुरू झाला आहे. मराठा समाजही आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. आक्रमक झालेल्या मराठा समाज संघटनांनी थेट अधिकाऱ्यांनाच याचा जाब विचारला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा आणि जायकवाडीला पाणी सोडण्याचा काहीच संबंध नाही. हा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी केला आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडले नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला..विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर
मराठावाडा-नगर-नाशिक ‘पाणी संघर्ष’
राज्यात यावर्षी पावसाचा अत्यल्प प्रतिसाद होता. यामुळे अनेक भागात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच येत्या काळात नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा यांच्यात पाण्यासाठीचा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तब्बल 8.603 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पाणी सोडण्याला कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यानंतर आता नवा वाद समोर आला आहे.