Ghati Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही (Ghati Hospital Death) अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे. या रुग्णालयात काहीच दिवस पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी हे एक महत्वाचे रुग्णालय आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे तसेच राज्याच्या अन्य भागांतूनही येथे रुग्ण उपचारासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात.
Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर
रुग्णालयात इतके मृत्यू कशामुळे झाले याची खात्रीशीर माहिती अद्याप मिळाली नसली तरी बाहेरच्या रुग्णालयांतील रेफर करण्यात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. आता ही घटना कशामुळे घडली, यामागील नेमकी काय कारणे आहेत याचा शोध घेतला जाईल. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयातही अशीच घटना घडली होती. एकूणच या मृत्यूच्या घटनांमुळे राज्यातील सरकारी दवाखान्यांतील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा अंदाज येतो.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची प्रचंड टंचाई आहे. हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकिनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.
2017 पूर्वी राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व औषधी द्रव्ये विभाग, एसआयसी, महापालिका अशा विविध यंत्रणांकडून स्वतंत्रपणे औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री अशा आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. पण खरेदीचे वेगवेगळे दर होते. यात सुसुत्रता आणण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात एक याचिका दाखल झाली होती.
Nanded Civil Hospital Death : खुनी सरकार म्हणत सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांनी शिंदे सरकारला घेरले
या याचिकेच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकत्रित खरेदी केल्यास कमीत कमी दर मिळावा म्हणून 26 जुलै 2017 तत्कालिन फडणवीस सरकारने हाफकीन महामंडळाच्या अंतर्गत खरेदी कक्ष स्थापन केला. यामार्फत राज्यातील औषधे आणि उपकरणांची सर्व विभागांची खरेदी करण्याची जबाबदारी देण्यात आली.