बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. (Beed) कोणतेही व्यसन नसताना एका ग्रामसेवकाला त्यांच्या पत्नीने संगनमत करून चक्क व्यसनमुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. केवळ मालमत्ता हडपण्यासाठी आणि आर्थिक वादातून हा कट रचल्याचा आरोप पीडित पतीने केला असून, याप्रकरणी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मानवी हक्क आयोगाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
तक्रारदार हे पेशाने ग्रामसेवक आहेत. ते आपल्या घरी असताना चार अनोळखी व्यक्ती तिथे आल्या. तुम्हाला शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे, असे खोटे सांगून त्यांनी यांना बळजबरीने गाडीत टाकले. मात्र, त्यांना पोलीस ठाण्याऐवजी एका खासगी व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात आले आणि तिथल्या तिसऱ्या मजल्यावर कोंडून ठेवले. पीडित व्यक्ती घरी न परतल्याने त्यांच्या भावांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला पत्नीने ते प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगून सर्वांची दिशाभूल केली. मात्र, सत्य बाहेर आल्यावर पत्नीचे खरे रूप समोर आले.
पगार खाते संयुक्त करा आणि घर माझ्या नावावर करा, तरच तुमची केंद्रातून सुटका होईल, अशी धक्कादायक अट तिने पतीसमोर ठेवली. यावरून हा सर्व प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे. अखेर पीडिताच्या भावांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे पीडित ग्रामसेवक व्यक्तीची त्या केंद्रातून सुटका झाली. सुटका करण्यापूर्वी संबंधित केंद्राने त्यांच्याकडून बळजबरीने १६,४०० रुपये फी म्हणून वसूल केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकारामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले असून, केंद्राचे संचालक आणि पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडिताने दिलेल्या लेखी तक्रारीत केली आहे.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी संताप व्यक्त केला. विधी सेवा प्राधिकरणाने यावर अहवाल मागवला असल्याचे सांगितले. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तेजस घुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नीने रीतसर शपथपत्र आणि पुरावे दिले होते, त्या आधारेच प्रवेश दिला होता. तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा दावा त्यांनी केला आहे.या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
