अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी ही अफवाच; परिसराच्या तपासणीनंतर कामकाज पुर्वव्रत

तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू.

  • Written By: Published:
Untitled Design (122)

Ahilyanagar District Collector’s Office : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे. ​आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व‌ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला.

बॉम्ब शोधक पथकातील ‘लुसी’ व ‘जंजीर’ या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी (SID) पथकाचेही सहकार्य लाभले. ​या सखोल शोध मोहिमेत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले.

​राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा प्रकार केवळ खोडसाळपणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत.

Tags

follow us