बीडच्या शेलापुरी येथे संजय गांधी निराधार (Beed) योजनेतला धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. येथेली गोविंद भगवान जाधव यांनी प्रशासनाकडं तक्रार दाखल केली असून, 1998 मध्ये निधन झालेल्या सत्यभामा भगवान जाधव यांच्या नावाने तब्बल 22 वर्षे पेन्शन काढण्यात आल्याचा दावा केला आहे. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट हयात प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जैन पत्रा उद्योगावर पोलिसांचा छापा, बीडमध्ये टाटा कंपनीची लोगो लावून बनावट पत्र्यांची विक्री
या तक्रारीप्रमाणे सत्यभामा जाधव यांचे 1 जानेवारी 1998 रोजी निधन झालं होतं. तरीही त्यांचं नाव शासकीय नोंदीत सुरू ठेवून निराधार योजनेचे अनुदान नियमितपणे उचललं गेलं, असा आरोप आहे. या प्रकरणात विजयमाला शिवाजी जाधव यांचे नाव पुढं आलं असून, दोन वेगवेगळ्या नावांशी संबंधित कागदपत्रांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. इतकच नाही तर संबंधित लाभ दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात इतकी वर्षे जमा होत असताना यंत्रणेच्या कुणाच्याही लक्षात हा प्रकार कसा आला नाही, असा सवालही गोविंद जाधव यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायतीपासून ते संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेकदा निवेदने दिल्याचे गोविंद जाधव यांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 13 जुलैपासून माजलगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
