छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक (Crime) बातमी समोर आली आहे. शहरातील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर आज शुक्रवार (दि. 21 ऑगस्ट)रोजी मन हेलावून टाकणारी घटना घडली. मुलाला संकटातून वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यानंतर आईचाही मृत्यू झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळं देवळाई सातारा परिसरात शोककळा पसरली आहे.
कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18) हा सकाळच्या सुमारास खवड्या डोंगरावर गेला होता. त्याची माहिती मिळताच आई-वडिलांसह स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. कुणालला समजावून सांगण्याचे तसंच त्याला सुरक्षितपणे खाली आणण्याचे प्रयत्न बराच वेळ सुरू होते.
सरकारच्या कामाची पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला बक्षीस; दाखवला घरचा रास्ता
कुटुंबीय आणि बचाव पथकाकडून कुणालशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्याचे वडील मुरलीधर चांदवडे यांनी मुलाला वाचवण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नादरम्यान दोघेही डोंगराच्या कड्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
ही घटना डोळ्यांसमोर घडल्याने कुणालची आई संगीता चांदवडे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि बचाव पथकातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला.
छत्रपती संभाजीनगरमधून तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी कुणाल मुरलीधर चांदवडे हा तरुणा आत्महत्या करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला वाचवायला गेलेले वडिल मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचाही मृत्यू झाला. pic.twitter.com/o0VYGL0KZR
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 21, 2026
कुणालने असं टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावं असून ते देवळाई सातारा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
