Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election) लागले आहेत. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच दबावाच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नाही. मात्र, इच्छुक उमेदवार सूचक शब्दांत मतदारसंघांवर दावा करू लागले आहेत. आताही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी पक्षाकडे मागितलेली नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर निवडणूक रिंगणात उतरू, असे वक्तव्य दानवे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तिकीट कुणाला द्यायचं हेही निश्चित नाही. चंद्रकांत खैरे की दानवे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. भविष्यात आणखीही नावं पुढं येऊ शकतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. अशी परिस्थिती असताना दानवे यांनी थेट निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने काही वेगळी समीकरणे तयार होत आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा डाव; भर सभागृहात अजितदादांनी जयंत पाटलांना झापलं
दानवे पुढे म्हणाले, की महाविकास आघाडी लोकसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे. येत्या 29 किंवा 30 डिसेंबर रोजी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल याबाबत काही ठरलं का यावर दानवे म्हणाले, उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित नाही. मी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही पण पक्षानं जर आदेश दिला तर निवडणूक लढवू असे दानवे म्हणाले.
महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र अजून ठरलेलं नाही. परंतु तिन्ही पक्षांकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. याआधी संजय राऊत यांनीही ज्या ठिकाणी आधी ज्या पक्षांचे उमेदवार निवडून आलेत त्या ठिकाणी त्याच पक्षांचा उमेदवार असावा अशी भूमिका मांडली होती. यावर आघाडीतील नेत्यांच्याही प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र अजूनही जागावाटप निश्चित झालेलं नाही. देशभरात इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीत महाविकास आघाडीतील घटकपक्षही सहभागी आहेत. त्यामुळे जागावाटप करताना इंडिया आघाडीतील वरिष्ठांच्या उपस्थितीत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता 31 डिसेंबरपर्यंत जागावाटपावर काहीतरी निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, तावडेंच्या विधानाने शिंदे-अजितदादांना धडकी