Dhananjay Munde on Lok Sabha Election : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. कोणाला तिकीट मिळणार हे अजून निश्चित नाही तरीदेखील नेत्यांच्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथे तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरू केल्या आहेत. त्यात अमरसिंह पंडीत, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत मात्र आ. धनंजय मुंडे यांनीच खुलासा केला आहे. लोकसभा निवडणूक लढणार का?, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर मु्ंडे म्हणाले, माझ्यासाठी दिल्ली अजून दूर आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
जमालगोट्यावरून अजितदादांचे शिंदेंना खडेबोल! म्हणाले, सुंसस्कृत महाराष्ट्रात…
लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षाने माझ्याबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप लांब आहे. माझी लोकसभा लढविण्याची लायकी नाही. मी खूप लहान आहे, असे मुंडे म्हणाले.
तसे पाहिले तर या मतदारसंघात पीडीएफ, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, 2009 पासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. 1999 ते 2004 दरम्यान जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यानंतर पक्षाला पुन्हा या मतदारसंघात यश मिळाले नाही. सध्या या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे आहेत. बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस येथे ताकदीने लढणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संसद भवनाला विरोधकांचा आक्षेप; शिंदेंनी सांगितलं विरोधाचं नेमकं कारण
दरम्यान, महाविकास आघाडीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत हालचाली सुरू आहेत. आघाडीतील प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मध्यंतरी संजय राऊत यांनी शिवसेनेने जिंकलेल्या सर्व 19 जागांवर दावा सांगितला होता. यावर घटक पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले होते. पवार म्हणाले, याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील.