Download App

सरकारच्या हातात दहा दिवस, आरक्षण घेणारच! सभेआधीच जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘संपूर्ण जगाला आणि देशाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आज येथे आला आहे. मराठा समाज जसा शांततेत येथे आला तसाच शांततेत जाईलही. पण, आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे कारण, आरक्षण (Maratha Reservation) आमच्या हक्काचं आहे. या समाजाच्या वेदना आहेत ही सभा नाही. ही स्वतःच्या लेकरांची वेदना आहे. आज भविष्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलंय त्यांच्या मुलांचं. प्रचंड पैसा खर्च करूनही आज समाजातील मुलं बेरोजगार म्हणून जगत आहेत. प्रचंड शिकलेला असतानाही आज मराठा समाज अडचणीत आला आहे. एक टक्का कमी मिळाला तरी नोकरी मिळत नाही. म्हणून ही सामान्य मराठ्यांची लढाई असून ही लढाई आम्हाला जिंकायची आहे’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाला विरोध केला तर तू जास्त दिवस…; मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तब्बल शंभर एकरावर ही सभा होत आहे.  सभेला दुपारी बारा वाजता सुरुवात होणार आहे.  मात्र, काल रात्रीपासूनच मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीत जमा होत आहेत.  सभेचं मैदान गर्दीनं गजबजून गेलं आहे. सभा सुरू होण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

ते पुढे म्हणाले, ‘आमची भावना जर सरकारला समजत नसेल तर त्यांनी काय समजावं. आंदोलन शांततेत होणार त्यात काही बदल होणार नाही. पण, सरकारला आरक्षण द्यावचं लागेल. येत्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरी शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढील भूमिका ठरवू. मी आज समाजासमोर सगळी वस्तूस्थिती मांडणार आहे.’

गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख!

मग तुम्हाला ट्रकभर पुरावे पाहिजेत का ?

‘मराठा समाज शांत आहे. मायबाप समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केलं म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झालं तरी आरक्षण घेणार हे ठामपणे सांगतो आहे. सध्या शिंदे समिती मराठवाड्यात फिरत आहे. सरकारचं म्हणणं आहे की पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत. माझं त्यांना विचारणं आहे की तुम्हाला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा. आयोग किंवा समिती स्थापन केली तर ते तरी पाच हजार पानांचा अहवाल देतात का?’, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

Tags

follow us