एमपीएससी पेपरफुटीवरून महेबूब शेख अडचणीत; आमदार अभिमन्यू पवारांच्या बदनामीप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 6 जणांना अटक झाली आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला राजकीय वळन लागलं आहे.

News Photo   2026 09 05T141232.029

एमपीएससी पेपरफुटीवरून महेबूब शेख अडचणीत; आमदार अभिमन्यू पवारांच्या बदनामीप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून (MPSC) राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता कायदेशीर वळण मिळालं आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याच प्रकरणात किल्लारी येथे वकील अशोक बेद्रे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर महेबूब शेख यांची याबाबत अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला राजकीय कनेक्शन असल्याचे आरोपही पुढं आले आहेत. सुरुवातीपासूनच पेपरफुटीचा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या महेबूब शेख यांनी एमपीएससीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पेपरफुटीमागं मोठं रॅकेट असून त्याची पाळंमुळं एमपीएससीमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. अटक झालेल्या व्यक्ती या केवळ दलाल आणि ग्राहक असून, या प्रकरणामागील कथित मास्टरमाइंड अद्याप बाहेर असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

पुणे PMC आणि MPSC पेपरफुटीवरून मेहबूब शेख आक्रमक; गाढवेंच्या पत्नी अन् ऋतुजा पाटलांची रँक अचानक वाढली कशी?

या प्रकरणावर बोलताना शेख यांनी एका आरोपीचा आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला होता. संबंधित व्यक्ती पुण्याच्या महापौरांचं काम पाहत असल्याची माहिती आपल्याला मिळाली असून, त्याच्यामार्फत पेपरफुटीचे रॅकेट पुढे गेल्याची चर्चा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच संबंधित व्यक्तीच्या पत्नीचे नाव गुणवत्ता यादीत आल्याने आपण सोशल मीडियावर पोस्ट केल्याचेही शेख यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून फोन करून संबंधित पोस्ट हटवण्याची विनंती करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.

एमपीएससीचे केवळ एकच पेपर फुटलेला नसून यापूर्वीही अनेक पेपरफुटीच्या घटना झाल्याचा गंभीर आरोप शेख यांनी केला होता. ऋतुजा पाटील यांच्या कथित चॅटमुळं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आणि विद्यार्थी तसंच पालकांचं लक्ष या प्रकरणाकडं वेधलं गेलं, असा दावा त्यांनी केला. पेपरफुटीचे प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यांवरून आता त्यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, औसा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळं एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महेबूब शेख यांच्यावर नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत आणि या प्रकरणात पुढं पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडं लक्ष लागलं आहे. दुसरीकडं, महेबूब शेख यांची भूमिका आणि त्यांच्या आरोपांबाबत तपासातून पुढं काय निष्पन्न होतं, हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

महेबूब शेख काय म्हणाले?

औसा येथे माझ्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल, तरी मी हा आवाज थांबवणार नाही. एक गुन्हा काय, एक लाख गुन्हे दाखल झाले तरी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी माझा आवाज दाबता येणार नाही. हा लढा माझ्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहणार असंही ते म्हणाले आहेत.

Exit mobile version