नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nanded Hospital Deaths FIR Registered Against Dean & Delivery Department Doctor )
दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरदेखील हे मृत्युसत्र थांबले नाही. दुसऱ्यादिवशीदेखील आणखी 6 रूग्णांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसात 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठी खळबळ माजली होती. मृतांमध्ये 12 बालकांचादेखील समावेश होता.
Nanded hospital deaths | FIR registered against the Dean and Doctor of Delivery Department of Dr Shankarrao Chavan Medical College and Hospital. IPC Sections 304 and 34 invoked in the FIR.#Maharashtra
— ANI (@ANI) October 5, 2023
या घटनेनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहण्यास मिळाले. यानंतर पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होते तसेच पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाटील यांच्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर पाटील यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांची रुग्णायलयाला भेट
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर राज्याचे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली होती. ‘‘या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल’’, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसंच वर्ग-3 व वर्ग-4ची पदे ऑक्टोबरअखेर भरली जातील, पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
500 रुग्णांची क्षमता असताना या रुग्णालयात 700 ते 800 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचा जास्त समावेश आहे. हाफकीन संस्थेने वेळेवर औषधी पुरवठा केला नाही, ही बाब सत्य आहे. पण कोणत्याही औषधींचा तुटवडा नाही. जर औषधे बाहेरून आणायला लावली जात असतील, तर त्याही बाबींची चौकशी केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.
सरकारी दवाखान्यात औषधांची प्रचंड टंचाई
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची प्रचंड टंचाई आहे. हाफकीनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकीनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.