Download App

Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर

Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे (Nanded Hospital Deaths) तांडव सुरूच आहे. काल दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आज यामध्ये आणखी सात जणांची भर पडली. आजच्या मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. दरम्यान,  काल या दवाखान्यात 24 तासांत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी सात जणांची भर पडल्याने आता हा आकडा 31 वर गेला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर राज्य सरकारने या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर आज तिघा जणांची चौकशी समिती रुग्णालयात येऊन या घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.

Nanded Hospital Deaths : चौकशी होणारच! तिघांची समिती आज नांदेडात

या नव्या घटनेची माहिती चव्हाण यांनी ट्विट करून दिली आहे. ‘शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर आता घटनेतील (Nanded News) मृतांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आणखीही काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकशी समिती आज नांदेडात येणार

या घटनेवर संताप व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज चौकशी समिती नांदेडात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे. या तिघा जणांची चौकशी समिती मृत्यूच्या कारणांची चौकशी करणार आहे. तसेच अन्य काही बाबींची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रचारावर हजारो कोटींचा खर्च, औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड दुर्घटनेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

सीएम शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेची माहिती घेतली जाईल. तसेच जे काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या केल्या जातील असे शिंदे म्हणाले. या प्रकारानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आता तिघा जणांची समिती रुग्णालयात येऊन चौकशी करणार आहे. या चौकशीतून काय बाहेर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us