Maharashtra News : निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरकारी कार्यालयात अन् तेही चक्क खुर्चीवर बसून हिंदी चित्रपटातील गाणं म्हणण्याचा कारनामा एका तहसीलदारानं केला. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला होता. विरोधकांनीही हा मुद्दा हातोहात उचलला आणि सरकारवरच टीकेची झोड उठवली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा अहवाल विभागीय आयुक्तांना धाडला. या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केलं. हिंदी चित्रपटातील गाण्याचा असाही साइड इफेक्ट दिसून आला. हा प्रकार नेमका काय होता? कुठे घडला? निलंबनाची कारवाई झालेल्या तहसीलदाराचं नाव काय? जाणून घेऊ या..
नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे तहसीलदार प्रशांत थोरात यांची बदली झाली होती. यानिमित्त उमरी येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून त्यांनी गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये थोरात विविध हातवारे करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही असा सूर व्यक्त करण्यात आला.
उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 8 ऑगस्ट रोजी या कर्मचाऱ्यांचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयात खुर्चीवर बसून तेरे जैसा यार कहा हे गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर जोरदार टीका झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना चौकशीचे आदेश दिले. थोरात यांच्या या कृतीने शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या अहवालाचा आधार घेत विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबनाचे आदेश काढले.
या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे. सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.