छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण झालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीची पहिलीच बैठक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडं लागलं आहे.
आयोजकांकडून आजच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या तणावग्रस्त घटनेमुळे महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती, मात्र महाविकास आघाडीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
शिर्डीच्या साईमंदिरात 3 दिवसांत 4 कोटींची देणगी जमा
या सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), उद्धव ठाकरे(Uddhav Thaceray), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavhan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve), माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
आजच्या सभेसाठी परवानगी देताना पोलीस प्रशासनाकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करु नये. कार्यक्रमाच्या वेळी कोणताही रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात येऊ नये. वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणालाही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करता येणार नाही. सभेला कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, अशा विविध अटींवर महाविकास आघाडीला आजच्या सभेची परवानगी देण्यात आली आहे.