Download App

दिवटे मारहाण प्रकरण: बीड पुन्हा पेटले, मुंडे भाऊ-बहिण रडारवर !

Shivraj Divate beaten in Parli : काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, असे दिवटेचे म्हणणे आहे.

  • Written By: Last Updated:

Shivraj Divate beaten in Parli : सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) क्रूर हत्येने बीड (BEED)राज्यात गाजलं. राजकीय व सामाजिक दबावानंतर धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचा खास माणूस वाल्मिक (Walmik Karad) कराडच्या मुसक्या आवळल्या गेल्या. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद व पालकमंत्रिपद गेले. नवे एसपी आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद घेतले. अजितदादांची कडक भूमिका, नव्या एसपींने गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी मकोकाचे हत्यार वापरले. त्यामुळे बीडच्या गुन्हेगारांची मस्ती जिरली, असे चित्र तयार झाले. पण परळीतील लिंबोटी येथील शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला तेरा ते चौदा जणांनी जंगलात नेऊन अमानुष मारहाण करत त्याचा व्हिडिओही बनविला.दिवटे याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा होता ? दिवटेला मारहाण करण्याचे कारण काय ? दिवटेला मारहाण करणारी टोळी वाल्मिक कराडशी संबंधित आहे का ? हे जाणून घेऊया…


नेमकं काय घडलं? वाद कशावरून झाला?

शिवराज दिवटे हा जलालपूर येथे मित्रासोबत जेवायला गेला होता. जेवणानंतर तिथं काही भांडण लागले होते. तिथ तो भांडणं पाहायला उभा होता. त्यानंतर त्याला मित्रांनी परळीला सोडले. तो रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होता. पेट्रोल पंपाजवळ तर पाच मोटारसायकलवरील तेरा ते चौदा जणांनी शिवराज दिवटेला रस्तात अडवून त्याला मारहाण केली. समाधान मुंडे व त्याच्याबरोबर असलेल्यांनी दिवटे याला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. तेथे त्याला 13 ते 14 जणांनी लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. एकाने याचा व्हिडिओही तयार केला. मारहाण ते बोलत होते की, याला सोडायचे नाही. याला मारूनच टाकायचे. याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा, असा दावा आता दिवटे करत आहे. काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, असे दिवटेचे म्हणणे आहे. तर शिवराज दिवटे याच्या मित्रांनी 16 मे रोजी दुपारी समाधान मुंडे याला मारहाण केली होती. त्याचाही व्हिडिओ काढल्याचे समोर आले आहे. त्यानंतर समाधान मुंडे व इतरांना दिवटेला मारहाण केली. शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.

दिवटे याच्या फिर्यादीवरून वीस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. तर काही आरोपी फरार आहेत. जखमी शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जातीयवाद आणि तणाव

या घटनेनंतर बीडमध्ये पुन्हा जातीयवाद उफाळून आला. त्यातून तणाव निर्माण होऊ लागला आहे. त्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनीच स्पष्टीकरण दिलयं. या मारहाणीला जातीय रंग देऊ नये, हे सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.


वाल्मिक कराडची बी गँग अ‍ॅक्टिव्हच- सुरेश धस

या घटनेनंतर आमदार सुरेश धस हे पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी या प्रकरणात उडी घेतलीय. वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्यांची बी गँग परळी आणि बीड जिल्ह्यात अजूनही अ‍ॅक्टिव्ह आहेच. शिवराज दिवटेला मारहाण करणारे त्यांचेच लोक आहेत. महाकालचे भस्म आणि कपाळावर गंध लावणारे हे त्यांचेच पोरे आहेत, असा दावा सुरेश धस यांनी केलाय. म्हणजेच या प्रकरणातही ते धनंजय मुंडे यांना खिंडीत पकडणार हे नक्की दिसून येत आहे. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही दिवटे यांचे भेट घेत. धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवर टीका ही केली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही दिवटे यांची भेट घेतली.


मनोज जरांगे दिवटेला भेटले, थेट मुंडेंना इशारा

ही घटना घडल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिवराज दिवटेची रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी या प्रकरणावरही जरांगे हे आक्रमक झालेत. मारहाण करणाऱ्या आरोपींना मोक्का लावला पाहिजे. हे सुधारणार नाही. ही गुंडाची टोळी आहे. हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे. आपल्या लेकरांना असे मारून टाकणार असतील तर या उंदराचा सुळसुळाट कायमचा संपवावा लागणार आहे. यांच्यावर प्रहार करण्याची गरज आहे. मी आता मनावर घेतले आहे. दोघेही लोकांना समजून सांगतील, असे वाटत होते. परंतु हे संपून घेणार आहेत, असा इशाराच मनोज जरांगे यांनी नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दिलाय. तर माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित शिवराज दिवटे याची भेट घेतले आणि एक आवाहन केले आहे. दिवटे हे आमच्या कुटुंबातील लोक असल्यासारखे आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कोणताही जातीचं किंवा धर्माचं स्वरूप देऊ नये, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. त्याचबरोबर जे कोणी यातील आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असंही मुंडे म्हणाले आहेत.

शिवराज दिवटे प्रकरणानंतर बीडमधील वातावरण तापले आहे. बीड बंदची हाक दिली आहे. पण याप्रकरणावरून भडका होऊ नये. त्यातून सामाजिक स्वस्थ बिघडू नये, याची दक्षता प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे.

follow us