दुष्काळात आगीच्या झळा! बीड जिल्ह्यात गंजीला आग लागून सोयाबीनची राखरांगोळी

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे सोयाबीनच्या गंजींना आग लागण्याच्या घटनांचं सत्र सुरूच असून, सुमारे 14 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

News Photo   2026 10 14T181152.063

Takali Soybean Fire

Takali Soybean Fire : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी (Kaij) येथे सोयाबीनच्या गंजींना आग लागण्याच्या घटना सुरूच असून, सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी चार शेतकऱ्यांचं काढणी करून ठेवलेलं सोयाबीन जळून खाक झालं. शिवाजी कोंडीबा बारगजे, राजेंद्र कोंडीबा बारगजे, शंकर कोंडीबा बारगजे आणि दशरथ कोंडीबा बारगजे यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजींना दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. या घटनेत सुमारे 14 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आगीची माहिती मिळताच शेतकरी, शेजारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा वेग वाढल्याने सोयाबीन वाचवता आलं नाही. आधीच पावसाअभावी पिकाचं नुकसान झालेलं असताना कष्टाने पिकवलेलं आणि काढणी केलेलं सोयाबीन आगीत जळाल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

मराठवाडा पदवीधर आणि सतीश चव्हाण हे समीकरण कसं झालं?, राजकीय साथीदार बदलले तरी चौथ्यांदा विजयाचा विश्वास कसा?

टाकळी परिसरात गेल्या पाच दिवसांत सोयाबीनच्या गंजींना आग लागण्याची ही सहावी घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बाबासाहेब वैजनाथ घुले यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली होती. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गिरजाबाई बाबासाहेब घुले यांच्या गंजीला आग लागली. या घटनांनंतर दुसऱ्याच दिवशी चार शेतकऱ्यांचं सोयाबीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे टाकळी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.

पावसाअभावी उत्पादन घटलेलं असताना काढणीनंतर साठवून ठेवलेलं पीकही सुरक्षित नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. चार शेतकऱ्यांचं सुमारे 14 लाख रुपयांचं नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. सोयाबीनच्या गंजींना वारंवार आग लागण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नसून, या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे.

Exit mobile version