बीड जिल्ह्यातील बालविवाहाच्या वास्तवावर (Beed) पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अवघ्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीची तिसऱ्यांदा प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकृती बिघडल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात हलविण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे तिची प्रसूती केली.
बीडमध्ये खाद्यतेलाविरोधात एफडीएची मोठी कारवाई; 1.94 कोटींचे तेल जप्त, पाच परवाने निलंबित
‘सोनाली’ (नाव बदलले आहे) हिला प्रसूतीसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असताना तिला झटके येऊ लागल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळं शुक्रवारी तिला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे वैद्यकीय पथकाने तिची यशस्वी प्रसूती केली.
17 व्या वर्षी तीन अपत्यांची आई
सोनालीची ही पहिली प्रसूती नसल्याचं रुग्णालयीन तपासणीत समोर आलं. तिची यापूर्वी दोनदा प्रसूती झाली असून, तिला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. त्यामुळं अत्यंत कमी वयातच तिचं लग्न झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तिच्या यापूर्वीच्या दोन्ही प्रसूती कुठं आणि कोणत्या परिस्थितीत झाल्या, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
वैद्यकीय यंत्रणेलाही प्रश्न
सोनालीच्या गर्भावस्थेदरम्यान नियमित वैद्यकीय तपासण्या आणि सोनोग्राफी झाल्याची माहिती समोर आली आहे, असं असताना ती अल्पवयीन असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आधी का आणून दिले गेलं नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालयात दाखल करताना तिच्या वयाची व इतर कागदपत्रांची पडताळणी झाली होती का? याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची तयारी
अल्पवयीन मुलीचा विवाह आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसंच लागू असलेल्या पोक्सो कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. मुलीचा विवाह कधी, कुठं आणि कोणाशी झाला, तसंच यामध्ये कोणाची भूमिका होती, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच बालविवाह उघड
बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपाययोजना केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष घटनांमुळे या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आष्टी, शिरूर, बीड, केज आणि माजलगाव तालुक्यांतूनही यापूर्वी अशा घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणे मुली गर्भवती झाल्यानंतर किंवा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर उघडकीस येत आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे दावे आणि ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती यातील दरी या घटनेमुळं पुन्हा अधोरेखित झाली आहे. आता सोनालीच्या प्रकरणाचा सखोल तपास करून तिच्या आधीच्या दोन प्रसूती, विवाहाची पार्श्वभूमी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.
