प्रामाणिक कार्यकर्ते ही गोष्टच आजकालच्या नेत्यांसाठी दुरापास्त झाली आहे. नेत्यांप्रमाणे आजचा कार्यकर्ताही कधी या नेत्यासोबत तर कधी त्या नेत्यासोबत. थोडक्यात एखाद्या राजकीय नेत्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते ही त्याने आयुष्यभरासाठी जमवलेली संपत्तीच असते. नेता पदावर असो किंवा नसो, सत्तेत असो की विरोधात असो, हा कार्यकर्ता जोपर्यंत जमिनीवर काम करतो तोपर्यंत त्याला ‘नेता’ म्हणून ओळख असते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला असेच काही प्रमाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते बघायला मिळाले. बीडमध्ये तर या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे टोकच दिसून आले.
बीडमध्ये भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. हा पराभव या तिघा कार्यकर्त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्यातील वारणी, आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी आणि अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील तिघांनी टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे या तिघांनी आपल्या गावात पंकजांना लीड मिळवून दिली होती. प्रचारादरम्यान आपले कामही बंद ठेवले. मात्र, त्यानंतरही पंकजांचा पराभव झाला. पाहूयात याच तिघांविषयी माहिती…. (Three youth committed suicide after Pankaja Munde’s defeat in Beed Lok Sabha constituency)
शिरूर तालुक्यातील वारणी येथील गणेश ऊर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे हा अवघ्या 35 वर्षांचा तरुण. 35 म्हणजे हा त्याच्या उमेदीचाच काळ. या तरुणाला पाच एकर कोरडवाहू शेती आहे. हरिभाऊचे चुलत भाऊ नारायण बडे हेही भाजपचे कार्यकर्ते आहे. त्यांच्या माध्यमातून हरिभाऊची पंकजा मुंडे यांच्याशी ओळख झाली. तेव्हापासून त्याने पंकजा मुंडेंसाठी स्वतःला वाहूनच घेतले.
लोकसभा निवडणुकीतही हरिभाऊने 10 दिवस ट्रॅक्टर बंद ठेवला. मानूर जिल्हा परिषद गटात प्रचारात उतरला. जीव तोडून, तहान-भूक हरपून प्रचार केला. त्याच्या प्रचाराला यशही आले. वारणी गावातील एकूण तीन हजारपैकी पंकजा मुंडेंना तब्बल 2500 मते मिळाली. मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना केवळ 47 मते या गावात मिळाली. पण त्यानंतरही बीडमध्ये पंकजांचा पराभवा झाला.
हा पराभव हरिभाऊच्या चांगलाच जिव्हारी लागला. अखेरीस या नैराश्येतून 16 जूनला शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. हरिभाऊ बडे यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, लहान भाऊ, भावजय, दोन मुली आहेत. त्यातील आरोही ही आठ वर्षांची, आराध्या अडीच वर्षांची आहे. कोवळ्या वयाच्या या लेकांना सोडून हरिभाऊंनी राजकारणासाठी आयुष्य संपवले.
36 वर्षांचा पोपट मधुकर वायभासे हा मुळचा आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावचा रहिवासी. उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात आला. एका पतसंस्थेकडून सात लाखांचे कर्ज घेतले आणि अॅपेरिक्षा चालवू लागला. जोडीला तो मागच्या दहा वर्षांपासून पंकजा यांच्या सोशल मीडिया टीममध्ये काम करत होता. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याने काम थांबवून गाव गाठले. प्रचार सुरु केला.
चिंचेवाडी गावातून 427 पैकी 418 मते पंकजांना मिळाली. तर बजरंग सोनावणे यांना केवळ 9 मते पडली. पण 4 जूनला निकाल जाहीर झाल्यापासून तो अस्वस्थ होता. अखेर 12 जूनला रात्री अलविदा अशी पोस्ट टाकून त्याने झाडाला गळफास घेतला. पोपटच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा गावातील पांडुरंग रामभाऊ सोनवणे हाही तिशी-पस्तीशीतील तरुण. गावी दीड एकर कोरडवाहू शेती. जोडीला मजूरीही करत होता. पांडुरंगची सासरवाडी नाथरा गावाजवळील बेलंबा गाव. याच सासरवाडीला जाण्यायेण्यातून तो पंकजांच्या संपर्कांत आला. आता लोकसभेच्या प्रचारात मजुरी न करता तो पूर्णवेळ प्रचारात सक्रिय होता. गावातून त्याने पंकजा मुंडेंना लीडही मिळवून दिले.
पण त्यानंतरही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. चार जूनला निकाल लागल्यानंतरच त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे व अन्य ग्रामस्थांना सांगितले होते. ग्रामस्थांनी त्याची समजूतही काढली होती. पण ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पांडुरंगने मृत्यूला कवटाळले. त्यामुळे त्याचेही घरदार, संसार उघड्यावर आला आहे.
राजकारण, राजकीय नेते या स्वारस्य असणे ही मध्यमवर्गीयांचे लक्षण. पण हे स्वारस्याचे कधी वेडेपणात रुपंतर होते हे सांगता येत नाही. घरदार, संसार, काम सोडून राजकारणात वाहून घेणे हे वेडेपणाचेच आहे. त्यातही एखाद्या नेत्यासाठी, पक्षासाठी स्वतःचा जीव देणे हे तर पूर्णतः चुकीचेच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या प्रेमात आपल्याकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. लेट्सअप मराठीचेही कार्यकर्त्यांना हेच आवाहन राहील…