मराठवाड्यात मान्सून लांबणीवर पडणार…, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 15 जूनपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार आहे.

News Photo   2026 06 09T171716.503

मराठवाड्यात मान्सून लांबणीवर पडणार..., 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज वादळी (Weather) वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर तसेच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय झाला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. 12 ते 18 जूनदरम्यान मान्सून मराठवाड्यात दाखल होऊन संपूर्ण विभागात पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

मान्सून कोकणात दाखल, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, हवामान विभागाचा अंदाज काय?

सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं या कालावधीत राज्यभर समाधानकारक पावसाची अपेक्षा कमी असल्याचं चित्र आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 15 जूनपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

परंतु हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसल्याने शेतीच्या पेरणीसाठी पुरेसा ठरणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून 10 जूनच्या आसपास मुंबई आणि उपनगरात येणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी 20 जूनच्या आसपास कालावधी लागेल. मान्सूनपूर्व पाऊस मात्र पश्चिम महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे. विदर्भ-मराठवाडा आणि उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये मात्र उन्हाचा कडाका राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version