बीड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर (Beed) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी शेख मुस्सवीर शेख वशीम याला अटक केली आहे.
या प्रकरणाचा उलगडा एका चित्रपटगृहातील संशयास्पद हालचालींमुळे झाला. बीड शहरातील चित्रपटगृहात एक तरुण आणि तरुणी संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दीपक लंके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणीच्या पालकांना बोलावून तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकाराला वाचा फुटली.
जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला. एवढेच नव्हे तर या प्रकाराचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचेही सांगण्यात आले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत आरोपी तरुणीवर दबाव आणत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी बीड पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या मोबाईलची सखोल तपासणी करून त्यातील सर्व साहित्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी केली आहे. आरोपीने यापूर्वी अन्य कोणत्या तरुणींना अशाच प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही तपास करून संबंधितांचे जवाब नोंदवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते नारायण सिरसाट यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मैत्री किंवा मदतीच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी, आरोपीचे इतरांशी असलेले संबंध आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तरुणी आणि पालकांनी अशा प्रकारांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
घटनेनंतर बीडमध्ये सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
