Download App

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये मिळणार का? अदिती तटकरेंच्या वक्तव्याने खळबळ!

अभ्यास करून 2100 रुपयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही

Aditi Tatkare on Ladki Bahin Scheme : राज्यातील लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. आता लाडक्या बहिणी या पैशांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून 2100 रुपये कधी देणार? दिलेलं आश्वासन कधी पूर्ण करणार असे सवाल सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत. यातच आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे. अभ्यास करून 2100 रुपयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. दरम्यान, याबाबत कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही. तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेलाही नाही अशीही माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने तीन ते चार महिने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. आता 2100 रुपये द्यायचे म्हटल्यानंतर तशीच तयारी करावी लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत असे सध्या तरी दिसत आहे.

दरम्यान, या योजनेवरून सध्या गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीत असे तटकरे आधी म्हणाल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी पैसे माघारी घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे गोंधळ वाढला होता. परंतु, आज अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पैसे माघारी घेणार नसल्याचे माध्यमांंशी बोलताना स्पष्ट केले. एकूणच या योजनेवरून सत्ताधाऱ्यांतच गोंधळाची स्थिती दिसून येत आहे.

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार? मंत्री तटकरेंनी क्लिअरच केलं

चार हजार महिलांनी घेतली स्वतःहून माघार

महिला बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. जे लाभार्थी निकषात बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी, त्यांनी मिळवलेली रक्कम ‘थेट हस्तांतर योजने’शी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकारी स्पष्ट करत आहेत. परंतु, एकदा दिलेला लाभ पुन्हा मागे घेतला जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तरी देखील महिलांकडून स्वतःहून पैसे परत केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

follow us