Minister Girish Mahajan’s announcement : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 23 च्या पुढे गेला असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीची पाच विशेष पथके कार्यरत झाली असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.
दापोडी आणि फुगेवाडी परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय, विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी देण्याची मागणी पुढे आली आहे. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. तपास अधिक प्रभावी आणि सखोल करण्यासाठी सीआयडीने पाच विशेष पथके तयार केली आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके काम करत आहेत.
महायुतीचा विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार
विशेष म्हणजे या पथकांची जबाबदारी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. या पथकांनी हडपसर, फुगेवाडी, शिवाजीनगरमधील वडारवाडी आणि पांढरेमळा परिसरातील गावठी दारू अड्ड्यांची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला आहे.
याआधी या प्रकरणात मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह 10 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र मृतांचा आकडा वाढत गेल्याने राज्य सरकारने तपासाची सूत्रे सीआयडीकडे सोपवली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना कठोर आणि जलद कारवाईचे निर्देश दिले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता पीडित कुटुंबांना आर्थिक मदत आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर नेमकी किती कठोर कारवाई होते आणि तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
