पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, अमित शिंदेवर कोयत्याने वार, घायवळ गँगच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह
निलेश घायवळविरोधात तक्रार दिलेल्या मोबाईल दुकानदारावर कोयत्याने हल्ला, घायवळ गँग पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा
Pune Crime Nilesh Ghaywal gang:पुण्यातील कोथरूड (Kothrud) परिसरात भररस्त्यात झालेल्या कोयता हल्ल्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कोयता गँग चर्चेत आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अमित शिंदे हा निलेश घायवळविरोधात यापूर्वी नोंद झालेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील फिर्यादी असल्याने या घटनेला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे घायवळची टोळी अद्याप सक्रिय आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंगळवारी (14 जुलै ) सायंकाळी कोथरूडमधील आपल्या मोबाईल दुकानाबाहेर उभ्या असलेल्या अमित शिंदे यांच्यावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने (koyta gang) अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले. डोक्यावर दोन गंभीर वार झाल्याने शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असले, तरी या घटनेमागे जुने गुन्हेगारी संबंध असण्याची शक्यता नाकारली जात नाही.
अमित शिंदे यांचे नाव यापूर्वी निलेश घायवळशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात समोर आले होते. कोथरूडमधील त्यांच्या मोबाईल दुकानातून बनावट कागदपत्रांच्या आधारे घायवळने सीमकार्ड घेतल्याचा आरोप होता. तपासादरम्यान हे सीमकार्ड विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे उघड झाल्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून घायवळविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करताना हा गुन्हा महत्त्वाचा मानला गेला होता.
एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम
दरम्यान, निलेश घायवळ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशाबाहेर पळून गेल्याचे समोर आले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी यंत्रणा प्रयत्न करत असतानाच पुण्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने तो परदेशातूनच टोळीचे चालवत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अमित शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे त्यांच्या काही नातेवाईकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने टोळक्याने भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यामागे केवळ कौटुंबिक वाद कारणीभूत असू शकत नाही, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
सध्या कोथरूड पोलिसांनी गुन्हा नोंद करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यामागील खरे कारण आणि त्याचा संभाव्य टोळीशी असलेला संबंध याचा तपास सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.