Minor married woman taken from home and tortured : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला गावाच्या चावडीत बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.
ही घटना नीद तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे. पोलीस तपासादरम्यान पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे आणि तिचा बालविवाह झाल्याचे देखील समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आपल्या पतीसोबत रात्री घरात झोपली होती. उकाडा वाढल्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत आरोपी वैभव पटेकर हा घरात शिराळा. घरातील सर्वजण झोपेत असताना त्याने पीडितेला जबरदस्तीने उचलून गावाबाहेर नेले. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड हाताने दाबून ठेवले.
उणानंतर आरोपीने तिला गावाबाहेरील नदीपात्रात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारादरम्यान पीडित तरुणी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपीने तिला गावात परत आणत चावडीसमोर असलेल्या खांबाला दोरखंडाने बांधून ठेवले. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने मदतीसाठी आक्रोश केला. मात्र, हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर देखील काही काळ तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अखेर पीडितेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून तिची सुटका केली.
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेची वाईल्ड कार्ड एंट्री, पंचांशी गैरवर्तन प्रकरणी घातलेली बंदी उठवली
दरम्यान, ही घटना 10 मार्च रोजी घडली होती. मात्र भीतीपोटी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दोन दिवस ही बाब गुप्त ठेवली होती. अखेर दोन दिवसांनी पीडित तरुणीने आई आणि मामासह पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित तरुणीच्या हातापायांना दोरखंड बांधून तिला चावडीसमोर उभे केले असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पीडिता ही 17 वर्षांची असून अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा देखील तपास सुरू आहे. सध्या पोलिसांकडून पीडित तरुणी आणि आरोपी यांची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या अमानुष प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
