Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मतं फुटली (Maharashtra MLC Election) यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. कारण या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणता आला नाही. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. आता या फुटीर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेस (Congress Party) पक्षाने दिला. या फुटीर आमदारांत हिरामण खोसकर यांंचंही नाव घेतलं जात आहे. आपलं नाव समोर आल्याने आमदार खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदानाची फेरतपासणी करण्याची विनंतीही त्यांनी केल आहे.
विधान परिषद निवडणुकीतील गद्दारी महागात पडणार; फुटलेल्या काँग्रेस आमदारांची नावं आली समोर
मागील दोन दिवसांपासून पक्ष आणि मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी सुरू आहे. हे आता थांबलं पाहिजे. वरिष्ठांनी ही बदनामी थांबवली पाहिजे. विधानपरिषदेचे मतदान आम्हाला ठरवून दिले होते. काँग्रेसचे सात मतदान ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकरांनी तर बाकीचे मतदान शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना द्यायचे हे ठरलेले होते. आम्ही नाना पटोले आणि अन्य काही आमदारांसह मतदान केले.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची 16 आणि काँग्रेसचे सात अशी 23 मते होती. आता अशा परिस्थितीत पहिल्या पसंतीचे एक मत कुणाचे फुटले याची माहिती वरिष्ठांनी न्यायालयाच्या आदेशाने घ्यावी. मी माझं मतदान व्यवस्थित केलं आहे. महाविकास आघाडीची जी रणनीती ठरली होती त्यानुसारच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंती क्रमांकाची मतं दिली आहेत. तरीदेखील माझी बदनामी केली जात आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे कोणते आमदार फुटले असतील त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणीही आमदार खोसकर यांनी यावेळी केली. त्या आमदारांना कुणी बोलत नाही कारण त्यांना काही बोलण्याची ताकद यांच्यात नाही, असेही खोसकर म्हणाले.
..तर विधानसभा लढणार नाही, महायुतीला जागा देणार; आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा
या उपरही पक्षाला जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा असे आव्हान खोसकर यांनी दिले. दरम्यान, या निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नाव समोर आल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव घेतलं जात आहे. फुटीर आमदारांचा अहवाल दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना पाठवण्यात आला आहे. आता त्यांच्याकडून या आमदारांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.