Rohit Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीमध्ये कशा बैठका केल्या, याबाबत भाष्य केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार त्याची चर्चा सुरू झाली आहे. मी मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.
पार्टीलाचं टोपी घातली
आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते असा टोला आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांना लगावला आहे. तसंच, एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. त्यामुळे दादांनी जरी वेगळी टोपी घातली असली तरी आपण लोकसभेला पाहिलं स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीलाचं टोपी घातली असा चिमटा रोहित पवारांनी यावेळी काढला.
भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक
यावेळी रोहित पवार यांनी बारामतीत विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. बारामतीत कोण उमेदवार असेल असं विचारलं असता आमदार रोहित पवार म्हणाले, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला जाई. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असंही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.