MP Omraje clarifies his stance : धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने पुराव्यांअभावी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, हा निकाल माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा खटला होता. 20 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांची आणि त्यांच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या दिवसापासून आमचे संपूर्ण कुटुंब न्यायासाठी संघर्ष करत आहे. मात्र आज आलेल्या निकालामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे.
यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम असल्याचेही स्पष्ट केले. आमचा संविधानावर आणि न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही. आम्ही पुढील सर्व पर्यायांचा विचार करून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पवनराजे हत्याकांड प्रकरण : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक होत आपल्या कुटुंबाने गेल्या दोन दशकांमध्ये सहन केलेल्या वेदनांचाही उल्लेख केला. 20 वर्षे आम्ही न्यायाची वाट पाहिली. अनेक अडचणी, संकटे आणि संघर्षांचा सामना केला. मात्र आजचा निकाल आमच्यासाठी वेदनादायी आहे. हा निर्णय दुर्दैवी असून हे घोर कलयुग असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटातून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर आला आहे. याबाबत विचारले असता त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. मी माझ्या मतदारसंघात जाईन, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीन. त्यांच्या भावना आणि मत जाणून घेईन. त्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल. सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे ओमराजे यांनी स्पष्ट केले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर एकीकडे आरोपी पक्षाकडून समाधान व्यक्त केले जात असताना दुसरीकडे निंबाळकर कुटुंबाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाची पुढील लढाई उच्च न्यायालयात रंगण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागले आहे.
