केळ्यावरचा डाग दिसला, पण….चप्पल स्टँडचा उल्लेख करत सुपरफास्ट सुटलेल्या FDA ला कोर्टाची चपराक

FDA मंत्रालयातील कँटीनची तपासणी करून ती 98 टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र....

Letsupp Image   2026 07 31T124359.041

Letsupp Image 2026 07 31T124359.041

Mumbai High Court On FDA Action : राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळ, औषधांचे गैरव्यवहार आणि हॉटेलमधील स्वच्छतेच्या नियमांवरील कारवाईमुळे FDA चर्चेत असतानाच, नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने FDA च्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने FDA च्या कामकाजातील विसंगतीवर बोट ठेवत, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, व्हीव्हीआयपीही नाही. सर्वांना समान वागणूक दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत सुनावले.

पुण्यात चालणंच कठीण! 2,460 किमी रस्त्यांपैकी फक्त 747 किमीवरचं पदपथ : PMC

मंत्रालयाच्या कँटीनवरून न्यायालयाचा सवाल

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान FDA ने मंत्रालयातील कँटीनची तपासणी करून ती 98 टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर वकिलांच्या उपस्थितीत झालेल्या फेरतपासणीत वेगळेच चित्र समोर आले. या तपासणीत कँटीनमध्ये माशा, उघड्या ड्रेनेज जाळ्या, फ्रीजमधील अस्वच्छता, बेसिन परिसरातील घाण आणि साचलेले घाणेरडे पाणी आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. यावर न्यायालयाने FDA ला विचारले, “तुम्ही सात तास तपासणी करून 98 टक्के स्वच्छतेचा अहवाल दिलात, पण वकिलांनी अवघ्या अर्ध्या तासात इतक्या त्रुटी कशा शोधल्या?”

केळ्यावरचा डाग दिसला, पण ड्रेनेज दिसलं नाही?

सुनावणीदरम्यान न्यायालयाने मंत्रालयातील कँटीनचे फोटो कोर्टात दाखवत FDA अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “एका केळ्यावर काळा डाग दिसल्यामुळे तुम्ही हॉटेलवर कठोर कारवाई करता, पण मंत्रालयातील तुटलेली ड्रेनेज व्यवस्था, साचलेले पाणी आणि अस्वच्छता दिसत नाही?” असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. इतकेच नव्हे तर, “फोटोंमध्ये दिसणारा फ्रीज तर चपलांच्या स्टँडपेक्षाही अस्वच्छ दिसतो,” अशी कठोर टिप्पणीही न्यायालयाने केली.

अहिल्यानगरच्या तरुणाचं तुकाराम मुंढे यांना पत्र मुंढेंकडून थेट ॲक्शन

मंत्रालयाचा परवाना रद्द करा किंवा हॉटेलचा परवाना पूर्ववत करा

न्यायालयाने FDA ला स्पष्ट शब्दांत सांगितले की, एकतर मंत्रालयातील उपहारगृहाचा परवाना रद्द करा किंवा संबंधित पंचतारांकित हॉटेलचा रद्द केलेला परवाना पूर्ववत करा. दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अशाने मुंबईतील अर्धी आस्थापने बंद कराल

FDA च्या कारवाईच्या पद्धतीवर टीका करत न्यायालयाने म्हटले की, छोट्या त्रुटी आढळल्या म्हणून थेट परवाना रद्द करणे योग्य नाही. न्यायालयात एखाद्या याचिकेत त्रुटी असल्या तरी त्या सुधारण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे हॉटेल किंवा आस्थापनांनाही ‘इम्प्रूव्हमेंट नोटीस’ देऊन सुधारणा करण्याची संधी मिळायला हवी. तुम्ही जे करत आहात ते योग्य उद्देशाने आहे आणि लोक त्याचे स्वागतही करत आहेत. पण प्रत्येकवेळी थेट परवाना रद्द करणार असाल, तर अशा पद्धतीने मुंबईतील अर्धी आस्थापने बंद करावी लागतील, असे न्यायालयाने म्हटले.

FDA ची माघार; ‘इम्प्रूव्हमेंट नोटीस’ देण्यास सहमती

सुनावणीदरम्यान FDA ने संबंधित पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई मागे घेत, त्याऐवजी ‘इम्प्रूव्हमेंट नोटीस’ देण्यास सहमती दर्शवली. तसेच, उच्च न्यायालयाने मंत्रालयातील उपहारगृहालाही इम्प्रूव्हमेंट नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

Exit mobile version