अहिल्यानगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई; तब्बल चार कोटींचे बटर जप्त

Ahilyanagar: ‘क्रिमी डिलाईट पाश्चराईज्ड कुकिंग बटर’ या नावाने असलेला तब्बल 75 हजार किलो साठा आढळून आला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
FDA ACTION Ahilyanagar

FDA Action in Ahilyanagar: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असतानाच अहिल्यानगरमध्ये तब्बल चार कोटी रुपये किमतीचा संशयास्पद बटरचासाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निंबळक एमआयडीसी परिसरातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून तब्बल 75 हजार किलो पाश्चराईज्ड कुकिंग बटरचा साठा जप्त केला आहे. या बटरच्या लेबलिंगसह गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली आहे.


अन्न व औषध प्रशासनात तीन महिन्यात काय झालं?; वाचा, तुकाराम मुंढे यांचा वादळी ‘ॲक्शन’ रिपोर्ट

निंबळक एमआयडीसीतील अरिहंत कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर बटरचा साठा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या कारवाईदरम्यान ‘क्रिमी डिलाईट पाश्चराईज्ड कुकिंग बटर’ या नावाने असलेला तब्बल 75 हजार किलो साठा आढळून आला. बाजारमूल्यानुसार या साठ्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रीसाठी हा साठा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता.


आमदारकी पाच वर्षांची, पेन्शन मात्र आयुष्यभर ? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या बटरच्या लेबलिंग आणि दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाला संशय आल्याने संपूर्ण साठ्याची तपासणी करण्यात आली. हे उत्पादन पाटस (ता. दौंड, जि. पुणे येथील कंपनीचे असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे केवळ अहिल्यानगरमधील साठ्यापुरता हा विषय मर्यादित आहे. की या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत पुरवठा झाला आहे, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाई, बेकरी पदार्थ, फराळाचे पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांचा दर्जा, उत्पादनाची माहिती, लेबलिंग, साठवणूक आणि विक्री याबाबत नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी FDA कडून कारवाई केली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जप्त केलेल्या बटरचे नमुने अन्न विश्लेषकांच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या बटरमध्ये नेमकी कोणती त्रुटी आहे, त्याचा दर्जा अन्न सुरक्षा मानकांनुसार आहे की नाही, तसेच लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, हे स्पष्ट होणार आहे. अहवालात नियमभंग किंवा गुणवत्ता निकषांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उत्पादक, वितरक किंवा साठवणूकदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

चार कोटींचा एवढा मोठा खाद्यपदार्थांचा साठा एका कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवण्यात आला असताना त्याची गुणवत्ता, लेबलिंग आणि बाजारातील वितरण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असून, चार कोटींच्या या बटरचा प्रवास नेमका कुठपर्यंत पोहोचला होता, याचा तपास प्रशासन कसा करते, याकडे आता लक्ष लागले आहे.

follow us