Satyajeet Tambe : नाशिक – संगमनेर रेल्वे प्रस्ताव रद्द झाल्याने संगमनेर तालुक्यात राजकारण चांगलेच तापले आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. नाशिक – संगमनेर रेल्वेसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी आमच्यासोबत यावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केल्यानंतर आता लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी खताळ यांच्यावर हल्लाबोल करत मोठा दावा केला आहे. नाशिक – संगमनेर रेल्वेसाठी झालेल्या पहिल्या बैठकीसाठी मी स्वतः अमोल खताळ यांना फोन करुन बोलवले होते असा दावा त्यांनी केला आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले की, नाशिक – पुणे रेल्वेचा (Nashik-Pune Railway) प्रस्ताव रद्द झाल्यानंतर संगमनेर, अकोलेसह सिन्नर, नारायणगाव हे सगळे एकत्र करुन आम्ही जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलन 29 जून रोजी होणार होतं. आम्ही समृद्धी महामार्ग बंद करणार होतो मात्र प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर आम्ही आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित करण्याच निर्णय घेतला आहे. आता आम्ही 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आम्ही नाशिक -पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) चक्काजाम करणार आहोत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान रेल्वे पळून नेली ती काय नेहरु गार्डनमधील रेल्वे आहे का? असं म्हणणारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) आज रेल्वेसाठी बोलत आहे. राजकारण तर होणारच तुम्ही आज आमदार आहात उद्या नसाल, मी आज आमदार आहे उद्या नसेन परंतू भावी पिढ्यांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नाशिक पुणे रेल्वेसाठी जी पहिली बैठक झाली होती. त्या बैठकीसाठी मी स्वतः अमोल खताळ यांना फोन करुन बैठकीसाठी बोलवलं होतं असा दावा लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी केला.
HSRP Number Plates नसलेल्या वाहनांवर 1 जुलैपासून कारवाई-
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी टीईटी पेपर फुटीप्रकरणावर देखील भाष्य करत या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. शालेय शिक्षण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे. आज काही लोकं शालेय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे मात्र त्यांच्या राजीनाम्याने काहीही होणार नाही असं देखील यावेळी सत्यजित तांबे म्हणाले.
