Download App

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे! रामराजेंचा रणजितसिंहावर पुन्हा वार

फलटण : रणजितसिंह नाईक-निंबाळकर चुकून झालेले खासदार आहेत. सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar ) यांनी दिला आहे. ते फलटण तालुक्यातील कोळकी इे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर मेळाव्यात बोलत होते. (NCP (Ajit Pawar) MLC Ramraje Naik-Nimbalkar has warned Ranjitsinh Naik Nimbalkar.)

यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, आजच्या मेळाव्यात कोणत्याही नेत्याचा फोटो नाही. कारण सगळ्यांनाच मनमोकळेपणाने बोलता यावे. अजितदादांचा, सुनील तटकरे यांचा फोटो लावून शरद पवार यांच्यावर टीका करायची तर ते चुकीचे ठरेल. कारण शरद पवार यांचे माझ्यावर आणि फलटण तालुक्यावर अनंत उपकार आहेत. तरीही आपण अजितदादांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वच्छेने आपण महायुतीमध्ये गेलो आहोत.

‘जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा’; धमकीच्या फोनवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा

आजचा मेळावा हा केवळ मागील पाच वर्षे आपण जे काही सहन करत होतो, ते परत नको म्हणून आहे. चुकून झालेल्या खासदारामुळे मतदारसंघाने मागील पाच वर्षे खूप भोगले आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. ज्यांना फलटण कळत नव्हते, ते दिल्ली बघायला लागले आहेत. दहशत माजवणे हे आपल्या जिल्ह्यावरील संस्कार नाहीत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे असे नेतृत्व जिल्ह्याला आणि जनतेला नको आहे.

आता तुम्ही म्हणालं हे भाजपपर्यंत कसे पोहचेल? तर सगळ्या गोष्टी एका क्षणात दिल्लीपर्यंत पोहोचतात. ही त्यांची यंत्रणा आहे. मला त्यांचे सर्वे माहिती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथे जे धंदे चालले आहेत, ते धंदे त्यांच्यापर्यंत पोहचायला पाहिजेत आणि ते पोचवण्याचे काम आपल्याला या सभेद्वारे करायचे आहे.

ओबीसींबद्दल पराकोटीचा द्वेष! लायकी काढता, खुटा उपटण्याची भाषा करता…; भुजबळ जरांगेंवर संतापले

खासदार म्हणून यांनी काही कामच केलेले नाही. आणि आमदार म्हणून आम्ही केलेल्या कामावर हे नागोबा आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत. त्यामुळेच आगामी निवडणुकीत संजीवराजे यांना तिकीट मिळाले पाहिजे. त्यांची तलवार बाहेर काढली आहे. ती आता गुलाल उधळूनच म्यान करायची आहे. पण जर त्यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही.

रामराजे-रणजितसिंहांचे हाडवैर :

रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही. रणजितसिंह आधी काँग्रेसमध्ये होते, तर रामराजे राष्ट्रवादीमध्ये. मात्र तरीही दोघांमधून विस्तवही जात नव्हता. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. रणजीतसिंहांनी मला खूप त्रास दिला आहे, असे आरोप रामराजे जाहिररित्या आजही करतात. अशात रामराजे निंबाळकरांनी अजितदादांसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपच्या पंगतीत येऊन बसले.

follow us