Download App

‘भेट घेतली, कानमंत्र मिळाला’; शरद पवारांनी फेटाळला खासदार कोल्हेंचा राजीनामा

NCP : मुंबई : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा राजीनामा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर व्यतित होऊन डॉ. कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली होती. सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर राजकारणातील नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी विश्वास ठेवलेला असतो, त्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय का? अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली होती. (NCP Chief Sharad Pawar refused to accept resignation of NCP MP Dr. Amol Kolhe)

मात्र यावेळी पवारांनी कोल्हेंना कानमंत्र आणि आगामी काळासाठी कार्यक्रम देत त्यांचा राजीनामा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील तरुणाईची देखील राजकारणाबद्दल हीच भावना असून या तरुणाईचा लोकशाही प्रणालीवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास बसावा यासाठी काम करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे शिरुर मतदारसंघातील मतदारांनी 5 वर्षांसाठी जबाबदारी दिली आहे. मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लागली आहेत, अजूनही काही कामे मार्गी लावायची आहेत, त्यासाठी काम करा, असं पवारांनी त्यांना सांगितलं.

योद्धा मैदानात! पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून

तसंच आज या वयात पवार साहेब तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार माझ्यावर जी जबाबदारी टाकली जाईल, ती आपण पार पाडणार असल्याचे सांगून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं कोल्हे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 30 ते 35 आमदार उपस्थित होते. तसंच राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, अमोल कोल्हे उपस्थित होते. या तिघांच्याही उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांतच कोल्हे यांनी आपली भूमिका बदलत शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सध्याच्या घडामोडींमुळे व्यतित होऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

“आम्हाला बोलायचं आहे”: शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला

खासदार कोल्हे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत आलो. त्यामुळे 350 वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला स्वतःचं राज्य न म्हणता रयतेच राज्य म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राजकारणात आलो. त्यामुळे ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली, त्या सर्वसामान्य मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय का? ही अस्वस्थता मनात निर्माण झाली असल्याची भावना त्यांनी भावना शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

Tags

follow us