“आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला

“आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या (5 जुलै) संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. सध्याच्या परिस्थितीवर सर्व नेत्यांची भूमिका ऐकून घेणे आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. (After Ajit Pawar join Shinde Government cm eknath shinde call urgent meeting MLA and MP of Shivsena Shinde Group)

अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचे चित्र आहे. ही नाराजी आज काही आमदार आणि मंत्र्यांनी शिंदे यांच्याकडे उघडपणे व्यक्त केली. तसंच “आम्हाला बोलायचं आहे” असं म्हणत अनेक आमदारांनी शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. संजय शिरसाट यांच्यासारख्या आमदारांनी आपल्या मनातील खदखद थेट मीडिया समोर मांडली.

Eknath Shinde : तब्बल 51 वर्षानंतर दोनशे आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीपूर्वी आज शिवसेनेच्या महात्वाच्या नेत्यांची बैठक मंत्री दिपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्यावर झाली. या बैठकीत काही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत जे खासदार आहेत त्यांना सध्या जिथून निवडून आले आहेत तिथूनच तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आता राष्ट्रवदी काँग्रेस भाजपसोबत आल्याने आमच्या मतदार संघाचे काय होणार? असा थेट सवाल केल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडी आणि वाद विकोपला जाण्याची चिन्हे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांना बैठकीसाठी बोलावले आहे.

अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या आमदारांना परतीचे वेध :

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली आहे. साम वृत्तवाहिनीशी बोलताना देसाई म्हणाले, सादला प्रतिसाद देऊ आम्ही. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की सकारात्मक विचार करु, असे सूचक विधान त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळातील बैठक झाल्यानंतर काही आमदार हे मुख्यमंत्री यांना भेटले. राज्यात सरकारचे बहुमत असताना राष्ट्रवादी काँगेसला सोबत घ्यायची आवश्यकता का होती? असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. चार ते पाच आमदार यांची समजूत काढता-काढता मुख्यमंत्री यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

योद्धा मैदानात! पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून

आमदार व मुख्यमंत्र्यांमध्ये केबिनमध्ये वाद वाढत होता. मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर देखील भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती. या सर्वांतून मुख्यमंत्री कुठलाही लवाजमा न घेता बाहेर पडले. त्यांनी सहाव्या मजल्यावर लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि थेट एकटेच पहिल्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांची केबिन गाठली. समर्थक आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री चिंतेत असल्याचे देहबोलीवरून दिसून येत होतं.

उदय सामंत यांच्या केबिनजवळ आलेल्या अनेक लोकांना मुख्यमंत्री एकटे कसे आले याचा आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री हे उद्योगमंत्री यांना थेट बोलवून घेऊ शकले असते. पण ते स्वतः उद्योगमंत्री सामंत यांच्या केबिनला आले. सुमारे अर्धातास अँटी चेंबरला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना आमदारांमध्ये पसरलेली नाराजी आणि संध्याकाळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची होणारी बैठक यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube