Chagan Bhujbal : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज महाविकास आघाडीतील जागावाटप आणि तिकीटवाटपाबाबत महत्वाची माहिती दिली. भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भुजबळ म्हणाले, याबाबत तिन्ही पक्षांचे नेते बैठक घेतील. ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्यानुसार तिकीटवाटप होईल. त्यामुळे कुणाला किती जागा मिळतात हा मुद्दा नाही. निवडून येण्याची क्षमता कुठल्या पक्षाकडे कुठल्या जागेवर आहे तसेच त्यांचा उमेदवार कोण आहे या गोष्टींचा विचार करून पक्षाचे नेते निर्णय घेतील. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकांना सामोरी जाईल, असे भुजबळ म्हणाले.
फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे
तुमचा तमाशा थोडा आटोक्यात ठेवा
महाविकास आघाडीच्या कारभारावर महसूलमंत्री विखे यांनी टीका केली होती. त्यावरही भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ म्हणाले, आमच्याकडे किर्तन आहे की तमाशा हे पाहण्याऐवजी शिंदे गट 22 जागा मागतोय तो तुमचा तमाशा आहे तो जरा आटोक्यात ठेवा. तुमचे दोन पक्ष असताना मतभेद होतात तर इकडे तीन पक्ष आहेत मतभेद होणारच.
मतभेद कुठे होत नाहीत एकच पक्ष असेल तरीही तेथे मतभेद होतात. की मलाच तिकीट मिळालं पाहिजे. याच गटाला तिकीट मिळालं पाहिजे. इथे तर तीन पक्ष आहेत मतभेद होणारच. पण, जोपर्यंत तिन्ही पक्षांचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सोमोरे जाईल, असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
त्यांचं काम चालू आहे चालू द्या
राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार तर मला विचारून होत नाही आणि थांबत नाही. आहे एवढ्या मंत्र्यांमध्ये काम चाललं आहे ना मग चालू द्या. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही, त्यामागे काय हेतू आहे हे काही मला माहित नाही.