पोलिसांचा छापा अन् उमेदवाराला हार्ट अटॅक, अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय घडलं?
अनिल शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक-15 मध्ये घडलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना प्रशासकीय कारवाईच्या तीव्र मानसिक दबावामुळे थेट हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे.
आज 12 जानेवारी रोजी आगरकर मळा येथील अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा घरात दाखल झाल्याने वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कारवाईमुळे शिंदे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला आणि त्याच तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.
आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले
अनिल शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर शहरभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाने ही कारवाई का केली? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शिंदे कुटुंबीयांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. माजी महापौर शीलाताई शिंदे आणि चिरंजीव मुन्ना शिंदे यांनी प्रशासन व सत्ताधारी यंत्रणेवर गंभीर आरोप करत, ही धाड राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून विरोधकांना घाबरवण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील निवडणूक रणधुमाळी अधिकच पेटली असून प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निवडणूक आयोग आणि वरिष्ठ स्तरावरून या गंभीर घटनेची दखल घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
