Jayant Patil on Leader of the Opposition : राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेल्यांतर आता राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यातील काही लोक सत्तेत सहभागी झाल्यामुळे आमचा विरोधातील आकडा कमी झाला आहे. म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकत नाही. विधानसभेतील विरोधी पक्षातील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावर काँगेसचे अधिकार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व फुटीर नेत्यांनी आज अचानक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदावर भाष्य केले. (NCP leader Jayant Patil clears his stand on Leader of the Opposition)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील 36 आमदारांसह भाजपसोबत हात मिळवणी करत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाने सध्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांचा 36 आमदारांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने या पदावर दावा सांगितला आहे.
अशात आता उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असेल याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसची असल्याचे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला. दरम्यान, विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून गांधी घराण्याचे विश्वासू आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री सुनील केदार, विजय वड्डेटीवर, यशोमती ठाकूर किंवा आमदार संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर आहेत. प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले कायम राहणार आहेत. तर बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार आहेत, अशी माहिती आहे.