‘पवार साहेबांना भेटले, ‘त्यांनी’ दिलगिरी व्यक्त केली’; जयंत पाटील यांनी सांगितली भेटीची इनसाइड स्टोरी

‘पवार साहेबांना भेटले, ‘त्यांनी’ दिलगिरी व्यक्त केली’; जयंत पाटील यांनी सांगितली भेटीची इनसाइड स्टोरी

Jayant Patil on Ajit Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये मंत्री बनलेल्या नेत्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा काही नाट्य घडणार का, अशा चर्चा जोरात सुरू झाल्या. मात्र, या भेटीत नेमकं काय घडलं, याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर शरद पवार गटातील नेते तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या भेटीत काय घडलं याबाबत एक धक्कादायक खुलासा केला.

पाटील म्हणाले, सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. त्या भेटी पाठीमागे कुणाचा काय उद्देश आहे ते आज तरी सांगणे अवघड आहे. पण, हे खरं आहे की त्यांनी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मोठा दृष्टीकोन ठेऊन सगळ्यांना एकत्रित करावं अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मात्र, पवार साहेबांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर आमचीही फारशी काही चर्चा झाली नाही.

राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दोन्ही गटाच्या नेत्यांनी दिली. मात्र, त्याआधी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचे सत्र सुरू झाले होते. राज्यात पुन्हा काही नवीन धक्कादायक घडामोडी घडणार का, मंत्र्यांनी अचानक भेट का घेतली असेल असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मात्र, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली. त्यामुळे निर्माण झालेल्या शंका काही प्रमाणात दूर झाल्या. मात्र,  तरीदेखील पुढे आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube